इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नांदगाव विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या गटात जोरदार राडा झाला. या राड्यात सुहास कांदे यांनी थेट समीर भुजबळांना मारुन टाकण्याची धमकी दिली. आज तुझा मर्डर फिक्स असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे नांदगाव मतदार संघात मोठी खळबळ निर्माण झाली. सुहास कांदे यांनी आणलेल्या मतदारांची बस समीर भुजबळ यांनी अडवल्यानंतर हे दोन्ही उमेदवार आमनेसामने आले. यानंतर हा राडा झाला. पोलिसांनी दोन्ही गटाला समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
नांदगाव मतदारसंघातील परिस्थिती नियंत्रणात…जिल्हा निवडणूक अधिकारी
नांदगाव मतदारसंघात आज सकाळी दोन उमेदवारांमध्ये मतदारांची ओळख पटविणाऱ्यावरुन वाद निर्माण झाला होता. तेथे पोलिस पथक वेळीच दाखल झाले असून लोकप्रतिनिधीत्व कायद्यान्वये कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे.
नांदगाव मतदारसंघात एका उमेदवाराने मतदारांच्या ओळखीवरून संशय व्यक्त केला होता. त्यावरून हा वाद निर्माण झाला होता. तथापि, पोलिस, निवडणूक निरीक्षक वेळीच घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच लोकप्रतिनिधीत्व कायद्यासह आदर्श आचारसंहितेनुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मतदारांच्या ओळखीबाबत उमेदवारांना संशय असेल, तर मतदान केंद्रावर मतदान अधिकारी ओळखपत्र पाहून मतदारांची ओळख पटवितात. ते खात्री करूनच मतदारांना मतदानाची परवानगी देतात, असेही जिल्हाधिकारी शर्मा यांनी म्हटले आहे. तसेच या घटनेमुळे मतदान प्रक्रियेवर कोणताही परिणाम झालेला नाही. मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता मतदान करावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी शर्मा यांनी केले आहे.