नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भयमुक्त नांदगाव, प्रगत नांदगाव, अशी घोषणा देऊन रणांगणात उतरलेले अपक्ष उमेदवार मा. खा. समीर भुजबळ यांनी जनतेसमोर वचननामा मांडला आहे. त्याचे प्रकाशन भुजबळ यांच्या हस्ते झाले आहे. हा वचननामा म्हणजे मतदारसंघाच्या सर्वंकष विकासाचा आराखडाच आहे. विजयी होताच या वचननाम्याची अंमलबजावणी सुरू केली जाईल तसेच वचन नाम्यातील प्रत्येक वचन पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करून नांदगावची ओळख विकसित तालुका अशी करू अशी ग्वाही भुजबळ यांनी यावेळी दिली आहे.
धनेर येथील प्रचार रॅलीत भुजबळ यांनी नांदगावच्या प्रगतीचा वचननामा प्रसिद्ध केला. यावेळी मजूर फेडरेशनचे सचालक राजाभाऊ खेमनर, बाळासाहेब बोरकर, मनमाड कृउबा सभापती दीपक गोगड, चंद्रभान कदम, आप्पा कुंनगर, भगवान सोनवणे, कपिल तेलोरे, योगेश कदम, विनोद शेलार, दत्तू पवार, सुभाष जाधव आदी उपस्थित होते.
विकासाचा भुजबळ पॅटर्न सध्या सर्वत्र चर्चेत आहे. नांदगवा-मनमाड-मालेगाव मतदारसंघातही विकासाचे प्रवाह खुले करण्यासाठी उमेदवारी करणाऱ्या समीर भुजबळ यांना सर्व क्षेत्रातून पाठिंबा लाभत आहे. गावोगावी त्यांचे उत्स्फुर्त आणि जय्यत स्वागत होत आहे. मतदारसंघाचा विकास नेमका कसा केला जाणार याची ब्लुप्रिंट असलेला वचननामा समीर भुजबळ यांनी मतदारांना सादर केला आहे. पंकज भुजबळ यांनी दहा वर्षात केलेली कामे लक्षात घेता आता त्यापुढील विकास कामे हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
असा आहे वचननामा
एकूण १२ पानी असलेल्या या वचननाम्यामध्ये जलसिंचन, उद्योग, रोजगार, आरोग्य, स्वच्छ व सुंदर मनमाड आणि नांदगाव शहर, सांस्कृतिक, परिवहन, रेल्वे, रस्ते, पर्यटन, पायाभूत सुविधा, कृषी, शिक्षण, युवक, महिला, आदी क्षेत्रांचा समावेश आहे.
धरणांवर बोटक्लब उभारणार
समीर भुजबळ हे खासदार असताना त्यांनी नाशिक शहरातील गंगापूर धरणावर भव्य बोटक्लब साकारला आहे. तशाच धर्तीवर गिरणा आणि माणिकपुंज या दोन्ही धरणांवर बोटक्लब, एमटीडीसीचे रिसॉर्ट आणि कलाग्राम साकारण्याची घोषणा वचननाम्यामध्ये करण्यात आली आहे.
सहापदरी काँक्रिट रस्ता
मालेगाव ते शिर्डी हा महामार्ग मनमाड शहरातून जातो. प्रचंड वाहतूक असलेल्या या महामार्गाचे रुंदीकरण होणे आवश्यक आहे. ही बाब ओळखूनच हा महामार्ग सहापदरी काँक्रिटचा करण्याची ग्वाही या वचननाम्यामध्ये देण्यात आली आहे. खासदारकीच्या काळात समीर भुजबळ यांनी नाशिक शहरामध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर भव्य उड्डाणपूल साकारला. अशाच प्रकारचा उड्डाणपूल मनमाड शहरात या सहापदरी महामार्गावर साकारला जाईल, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.
वचननाम्यातील महत्त्वाच्या बाबी अशा
- पाणी आणि सिंचनाचा प्रश्न प्राधान्याने सोडविणे. त्यासाठी मांडरपाडाच्या धर्तीवर महत्वाकांक्षी पार गोदावरी प्रकल्प साकारणे
- मनमाड आणि नांदगाव येथील औद्योगिक वसाहत कार्यान्वित करणे. शेकडो जणांना रोजगार उपलब्ध होईल असा उद्योग आणणे.
- कांदा, मका आणि कापूस या पिकांवरील कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना देणे
- धरण, कालवे आणि बंधाऱ्यांच्या ठिकाणी मत्स्यपालनाला चालना देणे
- मनमाड आणि नांदगाव हे स्वच्छ, सुंदर व हरीत बनवणे.
- तालुका क्रीडा संकुल सक्षम करणे. कुस्तीसाठी विशेष अकादमी स्थापणे
- मनमाड रेल्वे जंक्शन अत्याधुनिक दर्जाचे बनविणे
- मनमाड व नांदगाव फेस्टिव्हल सुरू करणे. नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करुन देणे. सेलिब्रेटिंना महोत्सवात आणणे.
- मनमाड शहरात भव्य शिवस्मारक आणि एकलव्य स्मारक उभारणे
- खाज्या नाईक किल्ल्याचे पुनरुज्जीवन करुन तेथे इतिहास संशोधन केंद्र साकारणे
- महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे कौळाणे येथे स्मारक साकारणे
- श्री क्षेत्र नस्तनपूर येथे भव्य शनी महोत्सवाचे आयोजन करणे
- मनमाड व नांदगाव शहरातील रस्ते काँक्रिटचे करणे
- आदिवासी गावे, वाडे आणि तांडे येथे ठक्कर बाप्पा आणि पेसा अंतर्गत विकास कामे करणे
- मतदारसंघात अत्याधुनिक हवामान केंद्र साकारणे
- तरुणांसाठी पोलिस आणि लष्कर प्रशिक्षण अकादमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, अभ्यासिका, ई लायब्ररी, वाचनालय सुरू करणे
- ग्रामीण आरोग्य केंद्र सक्षम करुन तेथे सुविधा उपलब्ध करुन देणे