नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नांदगाव बाजार समितीमध्ये एक आश्चर्यजनक प्रकार घडला आहे. अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचार दौऱ्यामुळे मंगळणे येथील शेतकऱ्याच्या कांद्याला दुप्पट भाव मिळाला आहे. निराश झालेला शेतकरी गावी हताशपणे परत जाण्याच्या मनस्थितीत होता. मात्र, प्रचार दौऱ्यामुळे त्याच्या कांद्याला उत्तम दर मिळाल्याने तो खुष होऊन गावी परतला.तसेच,या शेतकऱ्याने समीर भुजबळ यांचे आभार मानले आहेत. तसेच,भुजबळ यांनाच मी मत देणार असून शेतकरी बांधवांनाही भुजबळ यांच्या पाठिशी रहावे,असे आवाहनही या शेतकऱ्याने केले आहे.
मंगळणे येथील रमेश पवार या शेतकऱ्याने नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्रीस आणला. मात्र, या कांद्याला अवघा एक हजार रुपये क्विंटल असा भाव देण्यात आला.चांगल्या दर्जाचा कांदा असूनही भाव मिळत नसल्याबद्दल या शेतकऱ्याने समितीच्या सचिवांकडे तक्रारही केली. त्याचा फायदा न झाल्याने अखेर कांदा परत नेण्याच्या मनस्थितीत पवार होते. मात्र त्याचवेळी समितीच्या आवारात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांचा प्रचार दौरा आला. पवार या शेतकऱ्याने त्यांची आपबिती भुजबळ यांच्याकडे कथन केली. त्यानंतर भुजबळ यांनी कांद्याची पाहणी केली. कांदा चांगला असूनही भाव का मिळत नाही, अशी विचारणा भुजबळ यांनी बाजार समितीचे सचिव अमोल खैरनार यांच्याकडे केली. त्यानंतर या कांद्याचा दुबार लिलाव करण्यात आला. आणि या कांद्याला २२०१ रुपयांचा प्रति क्विंटल भाव जाहीर करण्यात आला. भुजबळ यांच्यामुळेच आपल्या कांद्याला दुप्पट भाव मिळाल्याचे सांगत हा शेतकरी आनंदला. त्याच्या चेहऱ्यावर हसू फुलले.
कांद्याला दुप्पट दर मिळाला
समीर भुजबळ यांच्यामुळे आज माझ्या कांद्याला दुप्पट दर मिळाला. मी अत्यंत समाधानी आहे. भुजबळ यांनी माझी आत्मियतेने चौकशी केली. बाजार समितीच्या कारभाराची दखलही घेतली. त्यांचे मनापासून आभार.
-रमेश पवार, कांदा उत्पादक शेतकरी, मंगळणे.