नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– सावरगाव भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे आमच्या भागाच्या विकासासाठी आता आम्हाला भुजबळच हवेत, अशी आग्रही मागणी परिसरातील ग्रामस्थांनी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्याकडे केली. त्यामुळे मतदारसंघात दिवसागणिक भुजबळ यांना वाढता प्रतिसाद मिळत आहे. तसेच त्यांचे निवडणुकीत पारडे जड होत आहे.
भुजबळ यांनी न्यायडोंगरी गटातील नस्तनपूर येथे प्रचाराचा नारळ वाढवून परिसराचा दौरा केला. त्यात पिंपरखेड हिंगणे, पिंपरी हवेली, चांदोरा, रनखेडे आणि पळाशी, सावरगाव आदी गावांचा समावेश होता. रस्ते दुर्दशा, शाळांची दयनीय अवस्था, पिण्याचे अशुद्ध पाणी याबाबत भुजबळ यांच्याकडे आग्रह धरला. या भागातील रस्ते पंकज भुजबळांच्या कालावधीत झालेले आहेत. गेल्या पाच वर्षात रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झाली आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या सुधारण्यासाठी या भागाला आता आपलीच गरज आहे. आम्ही आपल्या पाठीशी आहोत. आपण पुन्हा नक्की निवडून याल, असा शब्द ग्रामस्थांनी भुजबळ यांना दिला.
समीर भुजबळांना ग्रामीण भागात जनतेची मोठ्या प्रमाणात साथ मिळत आहे. दौऱ्यात यावेळी ‘भयमुक्त नांदगाव, प्रगत नांदगाव’ समितीचे अध्यक्ष विजय पाटील, रामूदादा पवार, शिवाजी जाधव, मविप्र संचालक अमित पाटील, जगन पाटील, भगवान सोनवणे, रतन हलवर, प्रताप गरुड, राजेंद्र आहेर, विनोद शेलार, कपिल तेलोरे, प्रसाद सोनवणे, दिनकर पाटील, जयश्री शिंदे, फैजल शेख यांच्या सहित मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.