नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यभरातील ३५७ तालुक्यांपैकी कायम दुष्काळी तालुका म्हणून संबोधला जाणारा माझा नांदगाव तालुका दुष्काळी तालुक्यातील यादीत नसावा. प्रत्येक शेतापर्यंत पाटचारीने पाणी जावे. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा. म्हणून मी माघार घेतली आहे. नांदगावचा विकास अपक्ष उमेदवार समीर भुजबळ हेच करु शकतात याची खात्री आहे. त्यामुळेच मी भुजबळ यांना पाठिंबा दिला आहे, अशी स्पष्टोक्ती भगवान सोनवणे यांनी दिली आहे.
भगवान सोनवणे पुढे म्हणाले की, नांदगाव मतदारसंघात चारही बाजूने धरणे असूनही कायम पाण्याचा तुटवडा दूर व्हावा यासाठी जलसिंचनाच्या उपाययोजना व्हाव्यात, नवतरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, मेंढपाळ बांधवाना ‘अभय’ मिळावे, ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात, जनसामान्यांना शासकीय कार्यालयात आपल्याच कामासाठी माराव्या लागणाऱ्या येरझाऱ्या थांबाव्यात, शेतकऱ्याला चोवीस तास वीज मिळावी, आरोग्याच्या सुसज्ज सेवा मिळाव्यात, जिल्हा परिषद शाळा वाचाव्यात आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मागील काळात मतदारसंघात वाढलेली दडपशाही संपून ती ‘हद्दपार’ व्हावी हे सर्व करण्याची क्षमता माजी खासदार तथा अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्यामध्ये आहे. त्यामुळे त्यांना जाहीर पाठिंबा देत माझी उमेदवारी मी मागे घेतली आहे, असे सोनवणे यांनी सांगितले.
प्रचंड मतांनी विजयी करावे
नांदगावचा विकास ही संकल्पना माजी खासदार समीर भुजबळ हेच राबवू शकतात. त्यांच्या शिट्टी निशाणीवर आपले बहुमोल मत आपण देऊन नांदगाव विकसित करायचे आहे. त्यामुळेच मी माझी उमेदवारी मागे घेत त्यांना पाठिंबा दिला आहे. विकासाचे व्हिजन असलेला आणि महाराष्ट्रातील महत्त्वाचा नेता म्हणून समीर भुजबळ यांच्याकडे पाहिले जाते. मी सुद्धा तोच विचार केला. भुजबळ हे नांदगावला निश्चितच प्रगतीच्या पथावर नेतील, याची मला ठाम खात्री आहे. त्यामुळेच आपण सर्वांनीही त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे.
भगवान(माऊली) सोनवणे