नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या पॅनलने १८ पैकी १५ जागांवर विजय संपादन करत पाच माजी आमदारांच्या पॅनलचा पराभव करत सत्ता राखली. या निवडणुकीत महाविकास आघआडीच्या पॅनलला दोन जागांवर समाधान मानावे लागले. तर हमाल मापारी गटात अपक्षाने बाजी मारली.
या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान झाल्यानंतर रविवारी मतमोजणी झाली. त्यात आ. कांदे यांना घवघवतीत यश मिळाले. या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवसेनेत फुट पटल्यानंतर ठाकरे गटात असलेले दोन्ही आमदार शिंदे गटात गेले होते. त्यात पालकमंत्री असलेल्या दादा भुसे यांना हिरे यांनी कृऊबा निवडणुकीत धक्का दिला. त्यामुळे आ. कांदे यांच्या नांदगाव कृऊबा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
आ. कांदे यांनी सत्ता राखण्यात यश मिळवले. या निवडणुकीत आमदार सुहास कांदे व बापूसाहेब कवडे यांच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी विकास पॅनलविरोधात माजी आमदार पंकज भुजबळ, अॅड. अनिल आहेर, जगन्नाथ धात्रक, संजय पवार, राजेंद्र देशमुख यांनी परिवर्तन पॅनल उभे केले होते. पण, त्यांना यश आले नाही.
या निवडणुकीत सोसायटी सर्वसाधारण गटातून एकनाथ सदगीर, कैलास पाटील, समाधान पाटील, दर्शन आहेर, साहेबराव पगार, जीवन गरुड, सतीश बोरसे तर महिला राखीव गटातून मंगला काकळीज, अलका कवडे, इतर मागासवर्ग गटात अमित बोरसे, विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून पोपट सानप, ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून अनिल वाघ, अर्जुन पाटील आर्थिक दुर्बल गटातून दीपक मोरे तर अनुसूचित जमाती गटात अनिल सोनवणे, तर व्यापारी गटात यज्ञेश कलंत्री, अमोल नावंदर तर हमाल मापारी गटात अपक्ष निलेश इप्पर हे विजयी घोषित करण्यात आले.
Nandgaon APMC Election Result Suhas Kande