नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील बोलठाण-जातेगाव येथील कृषी महाविद्यालयात शिकणा-या जळगाव बुद्रुक येथिल सागर म्हसू कांदे या १९ वर्षीय तरुणाचा कॉलेज आवारातील शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. कॉलेज मधील शिक्षकांनी त्याला शेततळ्यावर मासे काढायला पाठवले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.
नातेवाईकांसह ग्रामस्थांनी नांदगाव पोलिसात कॉलेजच्या शिक्षकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. मात्र पोलिसांनी आकस्मित मृत्यू म्हणून गुन्हा दाखल केल्याने संतप्त ग्रामस्थांनी मृतदेहासह ४ तास रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी, दंगा पथक घटनास्थळी पोहचले. त्यानंतर नातेवाईकांची मनधरणी करण्यात आली. मात्र जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. अखेर संध्याकाळी उशिरा लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. मात्र यात नांदगाव चाळीसगाव संभाजीनगर रस्त्यावरची वाहतूक मात्र ठप्प झाली होती.