नांदेड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेला रविवारी प्रारंभ झाला. दुपारी श्री खंडोबाची देवस्वारी निघाली. ‘यळकोट यळकोट’ जय मल्हारच्या गजरात बेल भंडारा, खोबऱ्याची उधळण करीत लाखो भाविकांनी देवस्वारीचे दर्शन घेतले. माळेगाव येथील श्री खंडोबाच्या यात्रेस पारंपारिक पद्धतीने सुरुवात झाल्यानंतर मुख्य रस्त्याने देवस्वारी निघाली. देवस्वारीचे विश्रामगृह येथे आगमन झाले.
यावेळी पालखी दर्शनाला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची उपस्थिती होती. त्यांच्यासोबत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य राजकुमार मुक्कावार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत मंजुषा कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे, ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता अमोल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, अमित राठोड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. घुले, कृषी विकास अधिकारी सचिन कपाले, कार्यकारी अभियंता अशोक भोजराज, पंचायत समिती दशरथराव आडेराघो, सरंपच प्रतिनिधी हनुमंत हुलगंडे, ग्रामपंचायत अधिकारी बी. सी. देवकांबळे, ग्रामपंचायतचे पदाधिकारी व हजारो भाविकांची उपस्थिती होती.
यावेळी पालखीचे मानकरी गणपतराव मल्हारराव नाईक (रिसनगाव), गोविंदराव नागेशराव महाजन (कुरुळा), व्यंकटराव मारोतीराव पांडागळे (शिराढोण), खुशालराव भगवानराव भोसीकर (पानभोसी) व गोविंदराव बाबाराव नाईकवाडे (पानभोसी), पांडुरंग नारायण पाटील (माळेगाव), मल्हारी रावसाहेब पाटील (माळेगाव), विजयकुमार शंकरराव कनकदंडे (आष्टुर) व अंबादास खंडेराव जहागीरदार (माळेगाव) यांचा देवस्थानच्यावतीने मानाचा फेटा बांधून गौरव करण्यात आला.
यावर्षी प्लास्टिक मुक्त व कचरा मुक्त होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेने उत्तम नियोजन केले आहे. तसेच पार्किंग, सुरक्षा व्यवस्था याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.पालखी सोहळ्यात पारंपारिक वेशभूषा परिधान केलेले वाघ्या मुरळी, वासुदेव सहभागी झाले होते.जिल्ह्यातील महत्त्वाच्या उत्सवात सहकार मंत्र्यांसोबतच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत कुटुंबासह सहभागी झाले होते. या यात्रेसाठी नांदेड जिल्हा परिषद, लोहा पंचायत समिती, माळेगाव ग्रामपंचायतीमार्फत भाविकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
रविवारपासून सुरू झालेली यात्रा पुढे ५ तारखेपर्यत सुरू राहणार असून या यात्रेतील शासकीय कार्यक्रम राष्ट्रीय दुखवट्यामुळे पुढे ढकलण्यात आले आहे. दोन जानेवारीपासून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. देशभरातील भाविक या ठिकाणी पुढील काळात येणार असून मोठा पशुधन बाजार येथे या कालावधीत सुरू होतो. तसेच पशुधन संदर्भातील आवश्यक वस्तू विक्रीची दुकानेही मोठ्या प्रमाणात असतात. याशिवाय या यात्रेत देणाऱ्या भाविकांसाठी २ जानेवारीला लावणी महोत्सव ही आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनेक सुप्रसिद्ध लावणी कलाकार व त्यांच्या अनेक चमू या ठिकाणी आपली कला साजरी करणार आहे. यात्रेदरम्यान भारताच्या ग्रामीण भागातील अनेक कलांचे पालखी महोत्सव दरम्यान नागरिकांनी सादरीकरण केले.
या यात्रेदरम्यान पोलीस विभागाने चोख, बंदोबस्त ठेवला आहे. नागरिकांनी कोणत्याही अपवादात्मक परिस्थितीमध्ये पोलिसांची मदत घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
उत्तम जागा पाहूनी मल्हाजरी, देव नांदे गड जेजुरी, उत्तुम रायाची जेजुरी गडाला नऊ लाख पायरी या जयघोषात माळेगावच्यात यात्रेत पारंपरिक वाद्याने खंडेरायाची सेवा अर्पण करायला सुरुवात केली. पारंपारीक गितासोबत डफ, तुनतुने आणि जयघोषाच्या गजरात अवघा परिसर दुमदुमला. उर्वरित नियोजित कार्यक्रम २ ते ५ जानेवारीपर्यंत होतील.