मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मराठवाड्याच्या विकासासाठी शासन दळणवळण सुविधांवर भर देत आहे. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मुळे नांदेड शहर मुंबईच्या अधिक जवळ आले आहे. यामुळे निश्चितच मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार उघडले आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
नांदेड-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ करण्यात आला. या रेल्वे गाडीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातून ऑनलाइन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. मंत्रालयात आयोजित कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना, प्रधान मुख्य परिचालन अधिकारी श्याम सुंदर गुप्ता, मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) अवनीश कुमार पांडे, विभागीय प्रबंधक हिरेश मीना आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय रेल्वे कात टाकत आहे. प्रगत देशांसारखी आरामदायी सुविधा असलेली भारतात निर्मित वंदे भारत रेल्वे ही त्याचेच प्रतीक आहे. मुंबई ते नांदेड हे ६१० किलोमीटरचे अंतर ९ ते ९.३० तासात पूर्ण होणार आहे. पूर्वी जालनापर्यंत धावणारी वंदे भारत आता हुजूर साहिब नांदेड पर्यंत जात आहे. या रेल्वे गाडीची क्षमता ५०० वरून १४४० पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच गाडीचे डब्बे ८ वरून २० पर्यंत वाढवण्यात आले आहे.
नांदेड हे शिख धर्मियांचे महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना, प्रवाशांना वेगवान व आरामदायी प्रवासाची अनुभूती ‘ वंदे भारत’ एक्सप्रेसच्या माध्यमातून होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस च्या सुखकर, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी मराठवाड्यातील जनतेचे अभिनंदनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केले.
नांदेड येथे आयोजित कार्यक्रमप्रसंगी खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, नांदेड परिशेत्राचे पोलिस उपमहनिरीक्षक शहाजी उमाप, पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, डीएमआर प्रदीप कांबळे आदी उपस्थित होते.
नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस विषयी थोडेसे…
मराठवाड्यातील नांदेडला राज्याची राजधानी मुंबईशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्सप्रेस.
नांदेड ते मुंबई असा ६१० कि. मी. चा प्रवास फक्त ०९ तास ३० मिनिटांत पूर्ण, इतर गाड्यांच्या तुलनेत प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी.
महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळे व धार्मिक स्थळांदरम्यान वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी दिवसभरातील वातानुकूलित प्रवासाची सुविधा.
हुजूर साहिब नांदेड हून बुधवार व मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हून गुरुवार वगळता आठवड्यातून सहा दिवस गाडीची सुविधा प्रवाशांना मिळणार आहे.
नियमित प्रवास करणारे प्रवासी, भाविक, अधिकारी व व्यापारी यांच्यासाठी ही गाडी अत्यंत उपयुक्त.
पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्रांना जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवास आणखी सोपा.