नांदेड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सीमावर्ती भागात मागास जीवन जगत असलेल्या नागरिकांनी सुविधा देण्याची मागणी करूनही महाराष्ट्र सरकार त्याकडे गांभीर्याने बघत नसल्याचे दिसून येत आहे. नांदेड जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील लोकं या दुर्लक्षितपणामुळे वैतागले असून, त्यामुळे चिघळण्यास सुरुवात झाली आहे.
२०१८ पासून हे सहा तालुके आपले प्रश्न मांडत आहोत. १६ तालुके असलेल्या नांदेड जिल्ह्यात माहुर, उमरी, देगलूर, बिलोली, किनवट, धर्माबाद या सहा तालुक्यांचा यात समावेश आहे. हे तालुके तेलंगणाला जोडून आहेत. रस्ते, वीज, पाणी यासारख्या समस्या येथे आहेत. तेलंगणातील नागरिकांना सर्व सुविधा मिळतात. तेथील सरकार मजूर, नोकरदार आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी राहते, असे या भागातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मोफत वीज, पाणी, बियाणे, शेती औजारे मिळतात. शिवाय मोफत शिक्षण मिळते. दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र या सुविधांसाठी झगडावे लागते.
आत्ताच्या घडीला चार हजार कुटुंबीयांचे तेलंगणात झालेले स्थलांतरही शासन थांबवू शकले नाही. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊ, असे समितीचे गोविंद मुंडकर यांनी सांगितले. जिल्ह्यातील सहा तालुक्यातील गावांनी तेलंगणात जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कृती समितीही स्थापन करण्यात आली असून, हा प्रश्न चिघळू शकतो.
Nanded District Taluka Telangana Maharashtra Threat