नांदेड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत 436 कोटी 48 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे आज भूमिपूजन करण्यात आले. शहरातील मलनि:स्सारण वाहिन्यांच्या बळकटीकरणाच्या कामांसह रस्ते विकास कामांचा यामध्ये समावेश आहे. चैतन्य नगर येथील शिवमंदीर परिसरात झालेल्या या भूमिपूजन कार्यक्रमास खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार बालाजी कल्याणकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे उपस्थित होते.
केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत नांदेड शहरातील मलनि:स्सारण वाहिन्यांचे बळकटीकरण आणि संलग्नीकरण कामासाठी 329.16 कोटी रूपये निधी मंजूर आहे. यामधून शहरात अद्याप मलनि:स्सारण वाहिनी नसलेल्या भागात नवीन मलनि:स्सारण वाहिनी करण्यात येणार आहे. तसेच ज्या भागातील मलनि:स्सार वाहिनी नादुरुस्त झाली आहे, तेथे जुनी वाहिनी बदलून नवीन मलनि:स्सारण वाहिनी जोडली जाणार आहे. एकूण 430 किलोमीटर लांबीच्या भूमिगत मलनि:स्सारण वाहिनीची जोडणी याद्वारे केली जाणार आहे. तसेच मलनि:स्सारण केंद्रातील विविध यंत्रसामग्रीचा यामध्ये समावेश आहे.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत नांदेड शहर रस्ते विकास प्रकल्पातील 107.32 कोटी रूपये निधी मंजूर आहे. या निधीतून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीतील 182 रस्त्यांची कामे होणार आहेत. या दोन्ही विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले.
कृषि महाविद्यालयाच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक निर्णय
नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, पैनगंगा नदीवर 1 हजार 600 कोटी रुपये खर्चाचे सात बंधारे बांधण्यास शासनाने मंजुरी दिली आहे यातून 25 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. विविध सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्याने 6 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असल्याचेही ते म्हणाले. लेंडी प्रकल्प असो की, नांदेडला जोडणारे रेल्वे प्रकल्प असो, शासन नांदेडच्या विकासासाठी पूर्ण सहकार्य करील, समृद्धी महामार्गाचा विस्तार नांदेडपर्यंत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हिंगोलीमध्ये शंभर कोटीचा हळद प्रकल्प शासन सुरु करत आहे. नांदेडच्या कृषी महाविद्यालयाचा प्रस्ताव तपासून त्यावरही सकारात्मक निर्णय घेतला जाईल,असेही मुख्यमंत्री म्हणाले.