नाशिक – पेठरोडवरील आरटीओ ऑफिस जवळ ४० कोटी रुपये देणगीतून महावीर जैन धर्मार्थ हॉस्पिटल उभे राहत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुविधांसह सुसज्ज असे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल नाशिककरांच्या सेवेसाठी मार्च महिन्यापासून सुरू होणार आहे. या हॉस्पिटलचा मुख्य उद्देश हा गोरगरिबांना योग्य आणि कमी दरात औषधोपचार मिळावे हा आहे, असे मत महावीर जैन धर्मार्थ संस्थेचे अध्यक्ष नंदलाल पारख यांनी मांडले.
इंडिया दर्पणच्या फेसबुक लाइव्ह मध्ये ते बोलत होते. बागेश्री पारनेरकर हिने मुलाखत घेतली. हॉस्पिटलच्या प्रवासविषयी बोलताना ते म्हणाले की, १९८६ पासून रविवार कारंजा येथे तेथील मजुरांसाठी, गोरगरीब आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी महावीर जैन धर्मार्थ दवाखाना सुरू आहे. मामासाहेब बागमार आणि शांताबाई छाजेड यांनी हा दवाखाना त्या काळी सुरू केला. या दवाखान्यात वर्षाला जवळपास पन्नास हजाराहून अधिक पेशंट येतात. पण ज्या पेशंटला ऍडमिट करण्याची गरज असते त्यांना मोठ्या हॉस्पिटलला पाठवावे लागायचे. अशावेळी त्यांना बाहेरच्या हॉस्पिटलचा खर्च परवडायचा नाही. म्हणून मामासाहेब बागमार यांच्या मनात विचार आला की मोठे अद्ययावत हॉस्पिटल बांधावे आणि १९९६ मध्ये पेठरोड येथे एक एकर जागेत काम सुरू झाले. पुढे महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली. सुरुवातीला ३ मजले बांधण्याचे ठरले पण त्यानंतर रसिकलाल धारिवाल यांनी ११ कोटींची देणगी दिली आणि समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी हात दिला त्यातून पुढे मोठे सुसज्ज हॉस्पिटल तयार झाले. असे त्यांनी सांगितले.
सोयी सुविधांविषयी बोलताना ते म्हणाले की, सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सर्व विभाग या हॉस्पिटलमध्ये असणार आहेत. सध्या १७ डॉक्टरांची टीम आहे आणि पाच सुसज्ज ऑपरेशन थिएटर आहेत. गोरगरिबांना खास सवलतीच्या दरात इथे योग्य उपचार मिळतील. तसेच सरकारी योजना, इन्शुरन्स सेवा याप्रमाणे सवलत मिळेल. त्यामुळे कोणत्याही गोष्टीला न घाबरता या हॉस्पिटल सेवेचा लोकांनी लाभ घ्यावा आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले. खडतर प्रवासविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, मी नाशिकमध्ये जैन बोर्डिंगमध्ये प्रवेश घेतला. सीएचा अभ्यास करण्यासाठी मी नाशिकला आलो. पाच वर्षे किसनलाल सारडा यांच्याकडे नोकरी केली. लहान भावाला इलेक्ट्रॉनिक्समध्ये रस होता, त्यात त्याने शिक्षण घेतले. आणि पुढे घनकर लेनमध्ये छोटे दुकान टाकले. भावाला मदत करण्यासाठी मी नोकरी सोडून त्याच दुकान बघायला सुरुवात केली. आणि मेहनत करून एका दुकानापासून सुरू झालेला प्रवास १४ दुकानापर्यंत वाढला. आज नाशिक, इगतपुरी, लासलगाव, घोटी अशा अनेक ठिकाणी पारख इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान आहे. वडिलांच्या खंबीर पाठिंब्यामुळे यशाचं शिखर गाठू शकलो, अस ते म्हणाले. माणसाने आपले ध्येय गाठण्यासाठी जिद्द, अफाट मेहनत करण्याची तयारी ठेवावी असा सल्ला त्यांनी दिला.
व्हिडिओ – सिध्दी दाभाडे, नाशिक