नांदगाव – तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने रेल्वेच्या पर्यायी मार्गामध्ये पाणी साचल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. यासंदर्भात नांदगाव येथील रेल्वेच्या पर्यायी मार्गाच्या प्रश्नावर मंगळवार ५ ऑक्टोबर रोजी केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री ना.डॉ.भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये अनेक दिवसांपासून पर्यायी मार्गामध्ये पाणी साचले असल्यामुळे शहराचे दोन भागांमध्ये विभाजन झाले असून पादचारी, विद्यार्थी, रुग्ण आणि दैनंदिन ये-जा करणाऱ्या वाटसरुंचे अतोनात हाल होत आहेत. यावर रेल्वे प्रशासनाने काय उपाययोजना केल्या त्याबद्दल अधिकाऱ्यांना विचारणा करत गेट नंबर 104,108,100 व गेट नंबर 2 मधील सबवेच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. त्याही लवकर दूर कराव्यात तसेच पावसाने तेथील रस्ते खराब झाले आहेत त्यांचीही त्वरित दुरुस्ती करणे, कमी क्षमतेचे पंप बसवणे, भविष्यातील तांत्रिक धोके लक्षात घेता सबवेचे बांधकाम करावे, सबवेच्या अनेक ठिकाणी लिकेज आहेत ते दूर करावेत, नागरिकांना सबवेला दळणवळणाची अडचण आल्यास पर्यायी मार्ग असावा अशा सर्व समस्या लक्षात घेऊन त्या तातडीने सोडविण्याच्या सूचना आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री, ना.डॉ.भारती पवार यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना केल्या. तसेच लोकप्रतिनिधी, स्थानिक प्रशासन, नगरपालिका, पोलीस प्रशासन, रेल्वे प्रशासन यांना स्थानिक पातळीवरील बैठक आयोजीत करून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या सूचना करण्यात आल्या. सदय आयोजित बैठकीत आ. सुहास अण्णा कांदे, जि.प.सदस्य डी.के.नाना जगताप, अनिल कुमार लाहोटी, रेल्वेचे मुख्य प्रबंधक, अश्वनी सक्सेना इंजि. सेंट्रल रेल्वे, भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे मॅनेजर एस.एस.केडिया, विभागीय अभियंता आर.सी.वाडेकर, राजेश कवडे, वरिष्ठ अभियंता रमेश कुमार मिना, तहसीलदार सिध्दार्थ मोरे, मुख्याधिकारी विवेक चांडे, नगराध्यक्ष राजेश कवडे, पोलीस निरीक्षक कातकाडे आदी उपस्थित होते.