नांदगाव – शहर व परिसरात झालेल्या अतिवृष्टीने नांदगाव शहरात मोठया प्रमाणात नुकसान झाले असून शाकांबरी व लेंडी नदीसी पूर आला. अनेकांचे संसार उघड्यावर पडले तर व्यापा-यांचे मोठे नुकसान झाले. रेल्वे स्थानकावर प्लॅटफॅार्म पर्यंत पाणी होते. या पावसाची विक्रमी नोद १३३ मिमी असली तरी प्रत्यक्षात पाऊस जास्त झाल्याचे बोलले जात आहे. रात्री १२ वा. पासून अडीच तास पर्यंत शाकांबरी नदी पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद होती. संतत व मुसळधार पावसामुळे रात्री १० वाजता येथील शाकांबरी व लेंडी नदीतील पाण्याची पातळी वाढू लागली. आणि नदीपात्रात असलेली अतिक्रमणे उध्वस्त झाली. या पावसामुळे अनेक लहान नाला बंडिंग व बंधारे फुटल्याने शेकडो हेक्टर पिकांसह जमिनीची हानी झाली. ठिकठीकाणी रस्ते मोरीवरील पुलाचे भराव वाहून गेले. नुकसानीचा आकडा निश्चित व्हायला तीन ते चार दिवस लागणार आहे. या पावसान नांदगाव शहरात मोठे नुकसान केले आहे. या पावासात दहेगाव येथील राजेंद्र देवरे यांचे दोन बैल व मोटार सायकल तसेच महादू काकळीज यांची म्हैस पुरात वाहून गेली आहे.
मंगळवारी मध्यरात्री लेंडी नदीला पहिला पूर आला. या पूरात म. गांधी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या दरम्यान असलेल्या पुलावरील अतिक्रमणे वाहून गेली. पूलावर चपला, किराणा, स्टेशनरी, फुटकळ साहित्य, चहाची टपरी, मोबाईल, इलेक्ट्रिकची दुकाने असून ती थेट नदीपात्रातच आहेत. पाण्याचा जोर एवढा होता कि आरसीसी बांधकाम असलेली दुकाने काही मिनिटातच प्रवाहपतित झाली. समता मार्गावर लोहार, सलून, चहा, हॉटेल्स, भंगारचे व्यावसायिक, ज्यूस, चपला अशी अनेक दुकाने आहेत. परंतु या मार्गावर पत्र्याची व कच्चे बांधकाम असलेली घरे सुध्दा आहेत. या सर्व घरात चार ते पाच फुट उंच पाणी साठले होते. घरातली भांडी, कपडे, सामांच्या पेट्या सर्व जलमय होऊन मोठे नुकसान झाले..आंबेडकर चौकात असलेले दुमजली व्यापारी संकुलाचा खालचा मजला पूर्ण पणे पाण्यात गेला. यात कापडाची रेडिमेड होजीअरीची, चपला, बूट याची गोदामे असल्यामुळे लाखोचे नुकसान झाले आहे.
या पावसामुळे शेकडो संसार उघड्यावर पडले आहेत. प्रथमच पाणी नांदगावच्या रेल्वे स्टेशनच्या प्ललफॅार्मला लागले. घरांचे पहिले मजले पाण्यात बुडाले तर रेल्वेचा नवीन सब वे सुध्दा पाण्यात बुडाला. महापुराच्या तडाख्यात नदी किनाऱ्यावर असलेली घरे, छोट्या व्यावसायिकांची दुकाने वाहून गेली. २००९ मध्ये असाच पूर आला होता. पण, यावेळचा पूर अधिकच विनाशकारी ठरला. लेंडी नदीच्या पुलावर गुप्ता स्टोअर्सचे जड दुकान पाण्याच्या रेट्यापुढे रस्त्यातच आडवे झाल्याने त्या मार्गावरील वाहतूक बंद झाली. रेल्वेने बांधलेला सब वे आठ फुट उंचीच्या पाण्याने भरून गेला. त्यामुळे औरंगाबाद येवला रस्त्याकडे असलेल्या शहराच्या दुसऱ्या भागातील व मल्हारवाडी गावाकडील दळण वळण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. दहेगाव नाका ते भोंगळे रस्त्यावर लेंडी नदी पात्रा पर्यंत पाणीच पाणी झाले होते. गुलजार वाडी परिसरात घरांमध्ये दोन ते चार फुट उंचीचे पाणी शिरल्याने, घरांमध्ये सर्वत्र गाळ साचला आहे. मटन मार्केट, बाजार समिती यात चिखल झाला. तालुक्यात लोहशिंगवे, भालूर व मोरझर या क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. साकोरे येथे संपर्क तुटला. या गावानजीकचा मोरखडी बंधारा सांडव्याच्या विरुध्द बाजून फुटला. न्यायडोंगरी देश नदीचे पाणी न्यायडोंगरी बाजारपेठेत घुसले.