नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – न्यू इंग्लिश स्कूल तसेच जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने १७ वर्षाखालील मुलींच्या तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा संपन्न झाल्या. सदर स्पर्धेकरिता तालुक्यातून अनेक शाखांनी आपला सहभाग नोंदवला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या क्रिडास्पर्धेत अंतिम सामन्यात कोंढार हायस्कूल विरुद्ध भालूर हायस्कूल यांच्यामध्ये लढत झाली. त्यामध्ये भालूर विद्यालयाच्या खो खो संघातील मुलींनी जोरदार लढत देऊन संघाला विजय प्राप्त करून दिला.
या विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जे. आर. काळे व क्रिडाशिक्षक एस.एस. गिते यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी सर्व खेळाडूंचे म. वि. प्र. संस्थेचे सरचिटणीस नितीनभाऊ ठाकरे व तालुका संचालक अमितभाऊ बोरसे व शालेय समितीचे अध्यक्ष कचरू पाटील, धनाजी जठार, विठ्ठलआबा आहेर व शालेय समितीचे सर्व सदस्य, यांनी विजयी संघाचे कौतुक केले.
त्याचबरोबर जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या सर्व यशासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
शाळेतील खेळाडूंनी तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला ही बाब संस्थेच्या दृष्टीने अत्यंत अभिमानास्पद आहे. त्या निमित्ताने संस्थेच्या नावलौकिकात निश्चितच भर पडेल असे म.वि.प्रचे नांदगावचे संचालक अमित बोरसे यांनी सांगितले.