नांदगाव – येथे रेल्वे अपघातात मुत्यू पावलेल्या स्वाती शिंदे यांच्या कुटुंबीयांची आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या पत्नी सौ.अंजुम सुहास कांदे यांनी सांत्वन पर भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी झाल्या. नांदगाव रेल्वे दुर्घटनेत स्वाती शिंदे यांची प्राणज्योत मावळली होती. त्यांना चार लहान मुली असून,या चिमुरड्यांच्या नावे आमदार सुहास कांदे आणि सौ.अंजुम कांदे यांनी प्रत्येक मुलीच्या नावे सुरक्षा ठेव रक्कम बँकेत जमा केली. त्याचे रीतसर कागदपत्र या वेळी त्या चिमुरड्यांच्या हाती सुपूर्द केले. तसेच भविष्यात येणाऱ्या अडचणी आणि शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलण्याचे आश्वासन अंजुम कांदे यांनी या वेळी दिले.
नियतीच्या मनात आलं की होत्याचं नव्हतं होऊन जातं याही घटनेत तसच काही झालं आणि संपूर्ण नांदगाव शहर हादरून गेलं. स्वाती ताई शिंदे यांचं दुर्दैवी निधन झालं आणि चार चिमुरड्यांच्या मातेचं छत्र हरपलं, ऐकायला ही अंतकरण पिळवटून टाकणारी ही घटना आहे.ही परिस्थिती त्या परिवाराला भविष्यात किती कष्टदायक असेल याचा विचार आपण करू शकतो.घरात आईचं नसणं हे किती क्लेशदायक असतं हे आपण समजू शकतो.पण नियती च्या पुढे आपलं काही चालत नाही आपल्या हातात आहे ते फक्त जे उरलंय त्याला जीव लावणं.आज त्या कुटुंबास आणि त्या चार निरागस मुलींच्या मदतीला धावून जाणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. एक कुटुंब प्रमुखाची जबाबदारी निभवतांना या गोष्टीचे भान ठेऊन आमदार सुहास आण्णा कांदे आणि सौ.अंजुम ताई कांदे यांनी चारही चिमुरड्यांच्या नावे सुरक्षा ठेव रक्कम बँकेत जमा केली आहे. निकिता रवी शिंदे,नंदिनी रवी शिंदे,साक्षी रवी शिंदे,स्वामींनी रवी शिंदे यांच्या प्रत्येकीच्या नावे जमा ठेविचे कागदपत्र त्यांच्या कडे सुपूर्द केले. सौ.अंजुम ताई कांदे यांनी रवी शिंदे यांच्या घरी सांत्वन पर भेट देऊन कुटुंबियांच्या दुःखात सहभागी झाल्या. या निरागस मुलींशी बोलतांना त्यांच्या शून्य नजरा आणि निशब्द चेह-याकडे पाहून उपस्थित सर्वांनाच मायेचा कंठ दाटून आला. सर्वांना गहिवरून आले.या पुढे भविष्यात येणारी कोणतीही अडचण सांगण्यास मागे पुढे पाहू नका मला लगेच फोन करा असे ताईंनी मुलींना आवर्जून सांगितले.मुलींच्या शिक्षणात हातभार लावण्याचे आश्वासन ही दिले. झालेली घटना अतिशय वेदनादायी असली तरी आता भविष्यात आपल्या मतदारसंघाचे कुटुंबप्रमुख म्हणून आम्ही सदैव उमच्या सोबत असल्याचा विश्वास अंजुमताई कांदे यांनी या कुटुंबीयांना दिला. या प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख सुनील जाधव,उज्वला खाडे, संगीता बागुल,ललिता राऊत,सरला घोगळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.