नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार काल मध्यरात्री विजेच्या कडकाटासह झालेल्या अवकाळी पावसामुळे नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील तांदूळवाडी येथील एका ६० वर्षीय शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला.
शेतात काढून ठेवलेले कांदे झाकण्यासाठी हा शेतकरी शेतात गेला असता अंगावर वीज पडून जागीच ठार झाला. नाना गमन चव्हाण (६० ) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
आठ दिवसापूर्वी वीजांचा कडकडाट
आठ दिवसापूर्वी मनमाड शहरात रात्री आठ ते साडे आठ वाजेच्या दरम्यान अचानक विजांचा कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यावेळी शहरातील वसंत हौसिंग सोसायटी मधील एका बंगल्यातील नारळाच्या झाडावर वीज पडल्याने नारळाच्या झाडाने पेट घेतला होता. १५ ते २० मिनिट झालेल्या जोरदार पावसाने वीजपुरवठा खंडित झाला होता.
या दिवशी जिल्ह्यातील चांदवड,येवला,कळवण येथे सायंकाळी सुमारास हलक्या स्वरूपाची गारपीट व पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले होते.
देवळ्यात शाळेचे पत्रे उडाले
तर देवळा तालुक्यातील दहीवड येथे जोरदार वादळी वाऱ्याने जिल्हा परिषदेच्या शाळेचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले,सुदैवाने शाळेची सुट्टी झाले होते.
या घटनेत कुठलाही अनुचित प्रकार घडला नसला तरी शाळेत असलेल्या वस्तूंचे मात्र पावसाच्या पाण्याने भिजून नुकसान झाले होते.