नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गर्भवती असलेली महिला रेल्वेने प्रवास करत कल्याणला जाण्यासाठी निघाली असता भुसावळ रेल्वे स्थानक सोडल्यानंतर तिला प्रसव वेदना जाणवू लागल्या. तीच्या जिवाची सुरू असलेली घालमेल सहप्रवासी महिला व रेल्वे कर्मचारी यांच्या लक्षात आली. त्यानंतर महिलांनी प्रसंगावधान राखत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्या महिलेची रेल्वेच्या बोगीतील शौचालयाजवळ तिची प्रसूती केली. या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. ही घटना धावत्या काशी एक्स्प्रेस मध्ये घडली. संजना दत्ता चव्हाण असे प्रसूत झालेल्या महिलेचे नाव आहे. नांदगाव रेल्वे स्थानकात याबाबत कळविण्यात आल्यानंतर रेल्वे विभगाचे डॉ.संदीप ठोके हे रुग्णवाहिका व वैद्यकीय टीमसह हजर झाले. डॉक्टरांनी तिची वैद्यकीय तपासणी करून महिला व तिचे नवजात बालक हे दोघेही सुखरूप असल्याचे सांगितले. त्यानंतर काशी एक्स्प्रेसने पुन्हा ती महिला कल्याणकडे रवाना झाली.