नांदगाव – पालकमंत्री छगन भुजबळ हे नांदगाव येथे पूर परिस्थिती पाहण्यासाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत आपत्तकालीन निधीवरुन भुजबळ व शिवसेनेचे नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. याचा व्हिडिओ सुद्दा सर्वत्र व्हायरल झाला. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना – राष्ट्रवादी एकत्र असले तरी नांदगाव विधानसभा मतदार संघात हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे होते. त्यात कांदे यांनी भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांचा पराभव केला. त्यामुळे त्याची किनारही या खडाजंगीला असल्याचे बोलले जात आहे.
नांदगाव मतदार संघात पावसाने हाहाकार घालीत मोठ्या प्रमाणावर नुकसान केले त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून पालकमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेला आपत्कालीन निधी द्यावा अशी मागणी आमदार सुहास कांदे यांनी केली असता हा पालकमंत्र्यांचा अधिकार आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे भुजबळ यांनी सांगताच दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली.यामुळे बैठकीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेती नुकसानीचे शंभर टक्के पंचनामे करावे यासाठी आमदार कांदे आग्रही होते. बैठक आटोपून भुजबळ जात असतांना आमदार सुहास कांदे समर्थकांनी पालकमंत्र्यांसमोर केली घोषणाबाजी. पालकमंत्री दिशाभूल करीत असून राज्यात कोल्हापूर व सांगली येथे ज्या प्रमाणे आपत्कालीन निधी देण्यात आला आहे. प्रमाणे निधी द्यावा पालकमंत्री दुजाभाव करीत आहे असा आरोप कांदे यांनी करीत नुकसानीचे शंभर टक्के पंचनामे न केल्यास प्रांताच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा आ. कांदे यांनी दिला .