इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनीट्रॅपचे केंद्र बनले आहे या माध्यमातून राज्यातील गोपनीय दस्तऐवज थेट असामाजिक तत्वांच्या हाती पोहोचत आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या प्रशासनाची विश्वासार्हता डागाळली जात असून राज्याची प्रतिमा मलिन होते आहे. एवढी गंभीर बाब असूनही सरकार यावर साधं निवेदन द्यायला सुद्धा तयार नाही, हे अत्यंत धक्कादायक असल्याचे सांगत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी या विषयाकडे सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी ते म्हणाले की, काल अधिवेशनात मी महत्त्वपूर्ण मुद्दा उपस्थित केला होता. पण, सरकार यावर गंभीर नाही.
यावेळी पटोले म्हणाले की, या आधी सदनात मी रेशनिंग व्यवस्थेतील भेसळीवर उपस्थित केला. गोरगरीब जनतेला दिला जाणारा तांदूळ निकृष्ट दर्जाचा आहे, याशिवाय रेशनिंग दुकानांवर बसवण्यात आलेली मशीनसुद्धा बोगस असल्याचे दिसून आले आहे. गरिबांच्या तोंडचा घास हिसकावला जात आहे, आणि यावर सरकारकडून कोणतीही ठोस माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
राज्यातील ज्वलंत प्रश्नांवर सरकारची ही उदासीनता अत्यंत चिंताजनक आहे. हनीट्रॅपसारख्या गंभीर सुरक्षाविषयक प्रकरणावर मौन, आणि रेशनमधील भेसळीवर कारवाईचा अभाव, या सगळ्यामुळे एकच प्रश्न निर्माण होतो, की या राज्यात नेमकं चाललंय काय? राज्याच्या सुरक्षेचे प्रश्न असोत किंवा गरिबांचं जीवनमान सरकारने हे प्रश्न गांभीर्याने घ्यायला हवेत.