मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभेच्या निवडणुकीनंतर ईव्हीएम मशिनवर संशय व्यक्त केला जात असतांना आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट मतांच्या आकडेवारीवर बोट ठेवले असून त्यांनी सोशल मीडियात एक पोस्ट टाकून त्यांनी एका दिवसात तब्बल ९ लाख ९९ हजार ३५९ मतांची वाढ कशी झाली? असा प्रश्न केला आहे.
त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार २० नोव्हेबर रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंत ६५.२% मतदान झाले होते.
दुस-या दिवशी म्हणजे २१ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता जाहीर केलेली अधिकृत आकडेवारी ६६.०५% होती.
निवडणूक आयोगाने स्वत: अधिकृतरित्या जाहीर केलेल्या आकडेवारीत १.०३% ची तफावत कुठून आली? एका दिवसात तब्बल ९ लाख ९९ हजार ३५९ मतांची वाढ कशी झाली?
लोकशाहीत प्रत्येक मताला किंमत असते. त्यामुळे वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीबाबत मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण होत असेल, तर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण देणे बंधनकारक आहे. निवडणूक आयोगाने चालवलेली लोकशाहीची थट्टा आम्ही खापवून घेणार नाही.