विशेष प्रतिनिधी, मुंबई
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे त्यांच्या विधानांमुळे सातत्याने चर्चेत राहतात. आताही त्यांनी चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. स्वबळावर लढण्याची भाषा केल्याने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री माझ्यावर पाळत ठेवत असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. लोणावळ्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत पटोले यांनी हा आरोप केला आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र ही बाब चर्चेची ठरत आहे.
दरम्यान, पटोले यांच्या या विधानाची विरोधी पक्ष असलेल्या भाजपनेही दखल घेतली आहे. याप्रकरणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे. घटक पक्षाच्या नेत्याचीच अशी अवस्था आहे तर इतरांचे काय, असा खोचक प्रश्नही फडणवीस यांनी विचारला आहे.
पटोले यांच्या या विधानाची दखल घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही घेतली आहे. पटोले यांनी कुठलेही विधान काळजीपूर्वक करावे, पुराव्यानिशी करावेत. पटोले यांचे वक्तव्य हे माहितीअभावी केलेले आहे, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे.