इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्यातील प्रशासनासाठी अत्यंत धोकादायक अशी घटना समोर येत आहे. हनीट्रॅपच्या माध्यमातून राज्यातील गोपनीय दस्तऐवज गुप्तचर यंत्रणांच्या आणि असामाजिक प्रवृत्तींच्या हाती पोहोचत आहेत. या गंभीर प्रकरणात काही वरिष्ठ अधिकारी, आयएएस अधिकारी आणि मंत्र्यांचाही समावेश असल्याची माहिती उघड झाली असल्याचे सांगत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी या विषयांकडे विधानसभेत लक्ष वेधले.
ते म्हणाले की, हनीट्रॅपच्या माध्यमातून जर राज्याच्या सुरक्षेशी निगडित संवेदनशील कागदपत्रे परकीय किंवा राष्ट्रविरोधी शक्तींच्या हाती गेली, राज्याची सुरक्षितता, धोरणात्मक निर्णय प्रक्रियेवर या गळतीचा थेट परिणाम होऊ शकतो, त्यामुळे या गंभीर घटनेची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली.
नेमकं काय आहे प्रकरण
राज्यातील ७२ वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि आजी- माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा खळबळजनक दावा नाशिक दौ-यावर असलेल्या एका मोठ्या राजकीय नेत्याने दोन दिवसापूर्वी पत्रकारांशी बोलतांना अनौपचारिक गप्पा मारताना केला होता. या सर्वांचे वादग्रस्त आणि संवेदनशील व्हिडिओ तयार करण्यात आले आहेत. हे सर्व जण हनीट्रॅपमध्ये अडकल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला, यात नाशिकमधील एका बड्या अधिका-याचाही समावेश आहे. यासबंधीच्या व्हिडिओबद्दलही या नेत्याने भाष्य केल्यामुळे त्याबाबत आता चर्चा रंगू लागली. नाशिकसह मुंबई, पुणे येथील बड्या अधिका-यांचा आणि नेत्यांचा या हनीट्रॅप प्रकरणात सहभाग असल्याची माहिती आहे. हा व्हिडिओ बाहेर आल्यास अनेक बड्या व्यक्ती अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. याच प्रकरणावर विधानसभेत आज नाना पटोले यांनी लक्ष वेधले.