इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बदलापूर चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला कायद्याने कठोर शिक्षा व्हायला हवी होती, याबद्दल कुणाचेही दुमत असू शकत नाही. पण एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना, पोलिस अधिकाऱ्याचीच बंदूक हिसकावून घेऊन गोळीबार करतो ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या कारवाईवर प्रश्न उपस्थितीत केले.
पटोले यांनी दिलेल्या प्रतिक्रियात म्हटले आहे की, या घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. एक महिना उलटला तरीही बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांना अद्याप अटक झालेली नाही, त्या आरोपींना अटक करण्यासाठी टाळाटाळ का केली जात आहे? फरार आरोपींना वाचवण्यासाठी या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काऊंटर करून प्रकरण संपवण्याचा डाव आहे का?