मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळतो ही अत्यंत लाजीरवाणी बाब असून छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राचा अपमान करणारी घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत आणि आमच्या दैवताचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही. या घटनेमुळे राज्यभरातील शिवप्रेमी जनतेमध्ये तीव्र संताप आहे. पुतळा कोसळल्या प्रकरणी फक्त ठेकेदार आणि अधिकारी नाही तर राज्य व केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
काल त्यांनी भाजपाच्या भ्रष्ट कारभाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे. ४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनानिमित्त मोठा गाजावाजा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी दुपारी कोसळला. नित्कृष्ठ बांधकामामुळे हा पुतळा कोसळल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. महाराजांच्या पुतळ्याच्या कामातही भ्रष्टाचार करणाऱ्या या भ्रष्टाचारी, गद्दारी लोकांना महाराष्ट्राची जनता कदापि माफ करणार नाही असे म्हटले होते.
त्यानंतर त्यांनी आज थेट पुतळा कोसळल्या प्रकरणी फक्त ठेकेदार आणि अधिकारी नाही तर राज्य व केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे.