अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नामपूर बाजार समितीने करंजाड उपबाजार समितीसाठी भरती केलेल्या हमाल व मापा-यांना तात्काळ कामारून कमी करावे असे आदेश राज्याचे सहकार व पणन मंत्र्यांनी बजावलेले असतांनाही नामपुर बाजार समितीच्या सचिवांनी मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत भरती केलेले कामगार कायम ठेवत कामगार कमी केल्याचा खोटा अहवाल जिल्हा उपनिबंधकांना दिला असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनिनच्या पदाधिका-यांनी सटाणा येथील सहाय्यक निबंध कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला माथाडी कामगार संघटनेचे नाशिक जिल्हा सरचिटणीस सुनिल यादव यांच्यासह सटाणा बाजार समितीमधील हमाल मापा-यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. उपषोण कर्त्यांचा आजचा उपोषणाचा तिसरा दिवस असून जोपर्यंत नविन भरती केलेले हमाल मापारी कर्मचारी यांना कामावरून कमी केले जात नाही तसेच नोंदीत कामगारांची हक्काची मजुरी मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा उपोषण कर्त्यांनी दिला आहे.