मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नाने मुंबईतील गणेशभक्तांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात विशेष ‘नमो एक्सप्रेस’ रवाना करण्यात आली. कौशल्य विकास मंत्री लोढा यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या.
कौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनात दरवर्षी गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी ही सुविधा देण्यात येते. कोकणात जाणाऱ्या २ हजार गणेशभक्तांसाठी मोफत नाश्ता आणि पाण्याची व्यवस्था यावेळी करण्यात आली.
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी म्हणाले की, “मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकारने गणेशोत्सव हा ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे दरवर्षीपेक्षा यावर्षी गणेशभक्तांमध्ये अधिक उत्साह दिसून येत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनात प्रवासासाठी गणेशभक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी अतिशय सुलभ प्रक्रियेने ही ‘नमो एक्सप्रेस’ कोकणात रवाना करण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी ही विशेष गाडी सोडण्यात आली असून, थेट खेडला पहिला थांबा घेणार आहे. त्यानंतर चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी या शेवटच्या स्थानकावर थांबणार आहे. कौशल्य विकास मंत्री लोढा यांनी ‘नमो एक्सप्रेस’ आयोजित करून अतिशय चांगली सुविधा दिली असल्याचे प्रवाश्यांनी सांगितले.