नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील नामको हॉस्पिटलमध्ये उभारण्यात आलेल्या बहुप्रतिक्षित अत्याधुनिक कार्डियाक केअर सेंटरमध्ये आज पहिली अँजिओग्राफी करण्यात आली. ही अँजिओग्राफी यशस्वी झाल्याने सर्वसामान्यांसाठी हृदयविकारांसाठी नामकोच्या निमित्ताने निदान व उपचाराचा नवा पर्याय खुला झाला आहे.
नामको कार्डियाक केअर सेंटरचे तज्ज्ञ हृदयविकारतज्ज्ञ डॉ. चेतन जैन यांनी पहिली अँजिओग्राफी करत कॅथलॅब यंत्रणेचा शुभारंभ केला. नामको हॉस्पिटलमध्ये शहरातील एक ५० वर्षीय महिला दाखल झाली होती. या महिलेला अधून-मधून छातीत दुखणे, चालताना दम लागण्याचा त्रास होत होता. तिला डॉक्टरांनी अँजिओग्राफी करण्याचा सल्ला दिला होता. डॉ. जैन यांनी केलेल्या अँजिओग्राफीत या रुग्णाच्या हृदयाच्या काही धमन्यांमध्ये अल्पशः प्रमाणात ब्लॉकेजेस आढळून आले. मात्र, नामको हॉस्पिटलमधील अत्याधुनिक तंत्रज्ञान व तज्ज्ञ डॉक्टरांचा अनुभव यामुळे महिलेला अँजिओप्लास्टिची गरज नसल्याचा सल्ला देण्यात आला. महिलेवर अन्य प्रभावी औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत. अँजिओग्राफीनंतर रुग्ण महिलेची तब्येत स्थिर असून, तूर्तास अतिदक्षता विभागात तिला देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. पुढील दोन दिवसांत तिला घरी सोडले जाईल. नामको हॉस्पिटलमधील कॅशलेस मेडिक्लेम इन्शुरन्स सुविधेचा या रुग्ण महिलेला लाभ झाला. त्यामुळे कुठलाही खर्च न करता तिची अँजिओग्राफी करता आली.*
यांचा होता सहभाग
हृदयरोगतज्ज्ञ डॉ. चेतन जैन, डॉ. अभिजित सोनवणे, डॉ. अर्चना कावळे, कॅथलॅब तंत्रज्ञ नीलेश खराडकर, श्याम मोरे, विशाल रायजादे, सिस्टर रंजना आहेर, सविता गावित, मनीषा गांगुर्डे यांच्या सहभागाने अँजिओग्राफी यशस्वी झाली.
अँजिओप्लास्टिला घाबरू नका
अँजिओप्लास्टिचे नाव घेतले तरीही अनेकांना हृदयशस्त्रक्रिया करावी लागेल की काय, अशी भीती असते. मात्र, अत्याधुनिक यंत्रणांमुळे आता ब्लॉकेजेसचे प्रमाण कळत असल्याने, गरज असली तरच स्टेंट टाकावी लागते. हृदयरोगाचे वेळीच निदान झाल्यास पुढील शस्त्रक्रिया व धोका टळू शकतो.*
-डॉ. चेतन जैन, हृदयरोगतज्ज्ञ