नाशिक: २००२ साली स्थापन झालेले नामको चॅरिटेबल ट्रस्ट कॅन्सर हॉस्पिटल गेल्या २० वर्षांपासून नाशिक शहरासह उत्तर महाराष्ट्रातील कॅन्सर रुग्णांवर निदान व उपचार धर्मार्थ दरात पुरवत आहेत. अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असे हे धर्मादाय हॉस्पिटल आहे. नामको कॅन्सर हॉस्पिटलमध्ये २०१९ पासून मल्टीस्पेशालिटी सुविधा सुरू केल्या आहेत. अनेकदा पेशंट हॉस्पिटलमध्ये असल्यावर रुग्णांच्या नातेवाईकांना त्रास होतो. हा त्रास लक्षात घेऊन नामको चॅरिटेबल ट्रस्ट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांसाठी महाराष्ट्रातील कोणत्याही हॉस्पिटलमध्ये नाहीत अशा उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असे नामको चॅरिटेबल ट्रस्ट कॅन्सर हॉस्पिटलचे सेक्रेटरी शशिकांत पारख यांनी सांगितले.
इंडिया दर्पण फेसबुक लाइव्ह मध्ये ते बोलत होते. बागेश्री पारनेरकर हिने मुलाखत घेतली. पुढे ते म्हणाले की, कॅन्सर रेडिएशन ट्रीटमेंट ही २५ ते ३० दिवस चालू असते. या काळात रुग्ण अपडाऊन करू शकत नाही. कारण बरेचदा रुग्ण नाशिकबाहेरून येतात, अशावेळी ज्या रुग्णाची रेडिएशन ट्रीटमेंट सुरू आहे त्यासोबत एका नातेवाईकाची आम्ही मोफत सोय करतो. त्यासाठी आम्ही हॉस्पिटलच्या आवारात सेवा सदनाची निर्मिती केली आहे. काहीही खर्च न होता नातेवाईक रुग्णासोबत राहू शकतात. त्याचबरोबर इतर पेशंट ज्यांना ५ ते ६ दिवस ट्रीटमेंटसाठी ठेवावे लागते त्यांच्या नातेवाईकांची नाममात्र दरात राहण्याची सोय होते. अशा सुविधा महाराष्ट्रातील कोणत्याही हॉस्पिटलमध्ये नाहीत.
आजच्या स्पर्धेच्या युगात धर्मादाय हॉस्पिटलचा निभाव कसा लागतो याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, आज भारतात कॉर्पोरेट हॉस्पिटलची संख्या वाढत आहे. पण सर्वसामान्य लोकांना कॉर्पोरेट हॉस्पिटलचा खर्च, वातावरण सुसह्य नसत. या गोष्टी लक्षात घेऊन ट्रस्टने तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित केले. उत्कृष्ट मशिनरी, उत्कृष्ट डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि उत्कृष्ट सोयी सुविधा या त्रिसूत्रीवर आम्ही काम करतो. हॉस्पिटलमध्ये आपुलकीच वातावरण आहे त्यामुळे रुग्ण समाधानाने उपचार घेऊन घरी जातात. नफा कमावणे हा उद्देश नसल्याने नाममात्र दरात लोकांना परवडतील असे दर आहेत त्यामुळे लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. दर महिन्याला ६० ते ७० रुग्णांवर कॅन्सर सर्जरी होते, ४५० ते ५०० रुग्णांवर केमोथेरपी केली जाते, ६० ते ७० रुग्ण रेडिएशनचे उपचार घेतात. दरवर्षी १७ ते १८ हजार इतर सर्जरी होतात. कॅन्सर आणि मल्टीस्पेशालिटी विभाग मिळून दरवर्षी साधारपणे ३० ते ३५ हजार रुग्णांवर उपचार केले जातात.
सरकारी योजनांविषयी ते म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारकांना दीड लाखांपर्यंत उपचार मोफत आहेत. तसेच केंद्र सरकारच्या पंतप्रधान आरोग्य विमा योजनेअंतर्गत ५ लाखांपर्यंत उपचार मोफत दिले जातात. याशिवाय मुख्यमंत्री सहायता निधी, पंतप्रधान सहायता निधी या योजनेतही हॉस्पिटलचे नाव नोंदवले आहे. तसेच शासकीय योजनांचे लाभ संपलेले असतील तर त्यांच्यासाठी साईबाबा संस्थान, सिद्धिविनायक ट्रस्ट, धर्मादाय ट्रस्ट यांच्याकडून आपण निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. याशिवाय अनेक दाते वेळोवेळी मदत करतात. नामको चॅरिटेबल ट्रस्टच्या इतर उपक्रमांविषयी त्यांनी सांगितले की, ट्रस्टचे नर्सिंग कॉलेज आहे, त्या माध्यमातून दरवर्षी २५० विद्यार्थी शिक्षण घेतात. ९५% विद्यार्थी हे अनुसूचित जाती व जमातीचे आहेत. शासकीय योजनेतून त्यांची फी दिली जाते. तसेच दोन वर्षांपासून फेलोशिप कोर्सेस सुरू केले आहेत. आरोग्य क्षेत्राशी संबंधित इन्फ्रास्ट्रक्चर, मॅनपॉवर आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत.
सर्वसमावेशक लोकांनी नामको हॉस्पिटलला एकदा भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले. शहरातील कॉर्पोरेट हॉस्पिटलशी आपण तुलना केली तर कोणत्याही बाबतीत आपण मागे नाही उलट एक पाऊल पुढे आहोत असे ते म्हणाले. गरीब असो वा श्रीमंत सगळ्यांवर सारख्याच पध्दतीने चांगले उपचार इथे केले जातात. उत्तर महाराष्ट्रातील विस्तीर्ण परिसर असलेले हे एकमेव हॉस्पिटल आहे. रुग्णांची सेवा करण्याचे आमचे ब्रीद आहे. गरिबांना परवडणारं श्रीमंतांना आवडणारं अशी आमची टॅगलाइन आहे. कोणाचाही वाढदिवस किंवा कार्यक्रमानिमित्त काही दान करायचे असेल तर नक्की नामको हॉस्पिटलला द्या असे आवाहनही त्यांनी केले.