नाशिक – नामको विश्वस्त मंडळाने अत्यंत कमी कालावधीमध्ये प्रशस्त, हवेशीर व आठ बायपॅप व्हेंटीलेटरसह आठ खाटांचा अतिदक्षता विभाग व ऑक्सीजन सुविधेसह ४२ खाटां कोविड रूग्णांसाठी उभारल्या आहेत. फक्त १० दिवसातच या कोविड केअर सेंटरचे मशीनरी, ऑक्सीजन, गॅस पाइपलाईन, बायपॅप, व्हेंटीलेटर्स, मल्टीपॅरा मॉनीटर्स, ईन्फुजन पंप इ. उपलब्ध करून प्रत्येक वार्डात करमणूकीसाठी टी.व्ही., पिण्याचे गरम व थंड पाणी, अत्याधुनिक ४ फोल्ड बेड तसेच तज्ञ कन्सल्टंटस, निवासी डाॅक्टर्स, प्रशिक्षित परीचारीका, सेवकवर्ग व आरोगयदायी आहार या सर्व प्रकारच्या सेवा, सोयीसुविधा रूग्णांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. या सर्व कामामधे पुरेसा ऑक्सीजन उपलब्ध होण्याची मुख्य अडचण आहे. संपूर्ण देशात व त्यातल्या त्यात नाशिक शहरातील खूप मोठया प्रमाणात कोविड पेशंटची वाढती संख्या व त्यामुळे अत्यांवश्यक वैदयकीय आरोग्य सुविधा तसेच ऑक्सीजनचा देखील खूप मोठया प्रमाणात तुटवडा जाणवत आहेे. पुरेशा ऑक्सीजन अभावी कोविड केअर सेंटर चालू होवू शकत नाही.
या परिस्थितीमध्ये पुणे येथील प्रथीतयश व्यावसायिक प्रकाशचंदजी धारीवाल हे नामको हाॅस्पिटलचे विश्वस्त अध्यक्ष सोहनलालजी भंडारी, सचिव शशिकांत पारख,खजिनदार अशोकभाऊ साखला यांच्या हाकेला प्रतिसाद देवून नामको हाॅस्पिटलच्या मदतीला धावून आले. प्रकाशचंदजी धारीवाल यांनी नामको कोविड सेंटरमध्ये ऑक्सीजनच्या मुबलक उपलब्धतेसाठी ऑक्सीजन प्लाॅंन्ट उभारण्यासाठी ४१ लाख रुपयाची मदत घोषित करून, आज ताबडतोब सदर रक्कम संस्थेच्या खात्यात जमा करून रूग्णसेवेस हातभार लावला आहे.
संस्थेचे अध्यक्ष सोहनलालजी भंडारी यांच्या दुरदृष्टीतून व मार्गदर्शनातून नामको हाॅस्पिटलचे यशस्वी वाटचाल सुरू आहे. कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून समाजऋण व बांधिलकी तसेच राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न संस्था करीत आहे. सर्वसामान्य रूग्णांना कोविड सारख्या गंभीर आजारात देखील अत्यंत प्रगत व अत्याधुनिक उपचार यंत्रणा व सेवा सुविधा संस्थेने उपलब्ध करून दिल्या आहेत, संस्थेपुढे ऑक्सीजन पुरवठयाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे अशा परिस्थितीत खजिनदार अशोक साखला यांच्या विनंतीला मान देवून प्रकाशचंदजी धारीवाल यांनी संस्थेला मदतीचा हात दिला आहे. संस्था धारीवाल परीवाराची सदैव ऋणी राहील तसेच संस्थेचे खजिनदार अशोक साखला यांच्या परिवाराने सदर दानराशी संस्थेला प्राप्त करुन देण्यासाठी विशेष प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचे देखील संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो असे संस्थेचे सचिव शशिकांत पारख यांनी सांगितले.
नामको हाॅस्पिटलमध्ये कॅन्सर विभाग, मल्टीस्पेशालिटी विभाग तसेच भविष्यातील कार्डीयाक केअर सेंटर व बोनमॅरो स्ट्रान्सप्लाॅट विभागाची देखील ऑक्सीजनची गरज या ऑक्सीजन प्लाॅंन्टमुळे भागविली जाणार आहे. हाॅस्पिटल स्वयंसिध्द होण्याच्या मार्गावरचा ऑक्सीजन प्लाॅन्ट हा मैलाचा दगड ठरणार आहे, तसेच सर्व सोयींनी युक्त व बनून तयार असलेले कोविड केअर सेंटर लोक सेवेला लवकरच अर्पण करता येणार आहे या योगदानाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी,सचिव शशिकांत पारख व संपूर्ण विश्वस्त मंडळाने धारीवाल परीवारास धन्यवाद दिले.