नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पोस्ट कार्यालय फोडून चोरट्यांनी सुमारे ३१ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात सीसीटिव्ही यंत्रणेसह जनरेटरची बॅटरी आणि तिजोरीतील रक्कमचा समावेश आहे. ही घटना एकलहरा कॉलनी भागात घडली असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाम्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिभा शशिकांत कुलकर्णी (रा.श्रीरामनगर,जेलरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कुलकर्णी या एकलहरा कॉलनीतील पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत असून ही घटना रविवारी (दि.१८) रात्री घडली. अज्ञात चोरट्यानी पोस्ट ऑफिसच्या दरवाजाचे कुलूप तोडून ही घरफोडी केली.
पोस्टात शिरलेल्या चोरट्यांनी कार्यालयातील कागदपत्राची उलथापालत करून भितींतील तिजोरीतून १५ हजाराची रोकड चोरून नेली. जातांना भामट्यांनी कार्यालयातील सीसीटिव्ही, डिव्हीआर तसेच जनरेटरी बॅटरीही चोरून नेली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक किरण कोरडे करीत आहेत.