नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नागपूर ते मुंबई असा लांबचा पल्ला अवघ्या आठ तासांत गाठून देण्यासाठी राज्य सरकारने समृद्धी महामार्ग बांधला. नागपूर ते शिर्डीपर्यंतचा प्रवासही सुरू झाला. मात्र, भीषण अपघातांनी गाजलेल्या या महामार्गावर आता लुटमार आणि दगडफेकीचेही प्रकार घडत आहेत.
नागपूर ते शिर्डी या मार्गावर अनेक महत्त्वाची शहरं लागतात. पण शहरांच्या बाहेरून जाणाऱ्या या रस्त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. इथे पोलीस स्टेशन नाही आणि पेट्रोल पंपही नाहीत. दुकानेही नाहीत. त्यामुळे वाहनांच्या हॉर्नच्या आवाजाशिवाय दुसरे काहीच नाही. अशात लुटमार आणि दगडफेकीचे प्रकार होत असल्याचे पुढे आले आहे. या महामार्गावर छत्रपती संभाजीनगरही लागतं. अलीकडेच या मार्गावर रात्री वाहनांवर तुफान दगडफेक झाली. तर लुटमारीची घटनाही घडली.
समृद्धी महामार्गावर एका टोळक्याने वाहन चालकाला बंदूक, तलवारीचा धाक दाखवून लुटले आहे. वाहनचालकाच्या दोन अंगठ्या, रोख 65 हजार रुपये असा एकूण 85 हजारांचा ऐवज लुटला आहे. त्यामुळे रात्रीचा प्रवास करणाऱ्या लोकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. समृद्धी महामार्गामुळे प्रवास सोपा आणि कमी वेळात करणं शक्य होत आहे. त्यामुळे अनेकजण रात्रीचा प्रवास देखील याच मार्गाने करत आहेत. मात्र असे असताना एकाच आठवड्यात घडलेल्या या दोन घटनांनी वाहनधारकांची चिंता वाढली आहे. तर समृद्धी महामार्गावर रात्रीचा प्रवास करताना अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
तर हे करा…
वाहनधारकांनी समृद्धी महामार्गावर रात्रीचा प्रवास करताना काळजी घेतली पाहिजे. तसेच महामार्गावर बचाव पथक आणि महामार्ग पोलिसांच्या नंबरचे फलक लावण्यात आले असून, अडचणीत वाहनधारक मदत घेऊ शकतात. तसेच 112 वर फोन करुन देखील मदत मागवता येऊ शकते.
बोगद्याजवळ लुटले
प्रशांत जानकर ठोकळ (राहणार सुयश पार्क, नवी मुंबई पनवेल) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. 14 मार्चला ते समृद्धी महामार्गावरुन प्रवास करत होते. दरम्यान सावंगी बोगद्याजवळ त्यांचे वाहन एका टोळक्याने अडवले. त्यानंतर त्या टोळक्याने त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच बंदुकीचा आणि तलवारीचा धाक दाखवून त्यांच्या सोन्याच्या दोन अंगठ्या आणि रोख 65 हजार रुपये असा ऐवज लूटला. एवढंच नाही तर मारहाण केल्यावर त्यांचे वाहन घेऊन टोळक्यांनी पलायन केले. या घटनेनंतर प्रशांत ठोकळ यांनी फुलंब्री पोलीस ठाणे धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. तसेच पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे.
Nagpur Shirdi Samruddhi Highway Theft Night Travelling