नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात ग्रामीण पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या परिसरातील नयाकुंडमध्ये असलेल्या एका हॉटेलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
नयाकुंड येथे असलेल्या ड्रिमव्हिला फॅमिली रेस्टॉरेंट आणि लॉजिंगमध्ये हॉटेलच्या व्यवस्थापकामार्फत सेक्स रॅकेट चालविण्यात येत होते. ग्रामीण पोलिसांनी छापा मारून हे रॅकेट उघडकीस आणले आणि हॉटेलचा व्यवस्थापक सुनील मेश्राम आणि सहायक शुभम कारेमोरे यांना अटक केली. पोलिसांनी छापा मारला तेव्हा एक महाविद्यालयीन तरुणी ग्राहकाच्या खोलीत होती. तिलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुनील चंद्रभान मेश्राम आणि शुभम कारेमोरे हे दोघेही दलालीचे काम करीत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. त्यानंतरच त्यांनी छापा मारून दोघांना ताब्यात घेतले. दोघेही सावनेर (जि. नागपूर) तालुक्यातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
या हॉटेलमध्ये तरुणींचे येणेजाणे वाढले होते. त्यामुळे आंबटशौकिनांच्या पार्ट्यांमध्येही सातत्याने वाढ झाली होती. सर्व पार्ट्या विशेषत्वाने शनिवार-रविवारी होत होत्या. यासंदर्भात पोलीस उपाधिक्षक राजेंद्र निकम यांना माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांना सापळा रचून आरोपींना ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार निकम यांनी एक बोगस ग्राहक हॉटेलमध्ये पाठवला. व्यवस्थापकाने व सहायकाने त्या ग्राहकासोबत ५ हजार रुपयांत सौदा निश्चित केला. ज्या खोलीत तरुणी होती त्याच खोलीत त्या ग्राहकाला पाठवले. खोलीत गेल्यानंतर ग्राहकाने पोलिसांना इशाऱ्याद्वारे माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी हॉटेलवर छापा मारून तरुणीला ताब्यात घेतले.
आरोपींची कबुली
ड्रिमव्हिला लॉजिंगमध्ये अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचे पोलिसांना कळले होते. पण त्यांनी छापा मारून तरुणीला ताब्यात घेतले आणि तरुणीकडून देहव्यापार करून घेणारे सुनील आणि शुभम यांना अटक केली. त्यानंतर आरोपींनी स्वतःच अनेक दिवसांपासून आपण हे सेक्स रॅकेट चालवित असल्याची कबुली पोलिसांना दिली.
५०० रुपयांत सौदा
व्यवस्थापक सुनील मेश्राम याच्याकडे आंबटशौकीन ग्राहक सातत्याने येत आणि ते तरुणींची मागणीही करीत. कमी वेळात जास्त पैसा कमावण्याच्या मोहात सुनील व त्याचा सहायक शुभम यांनी महाविद्यालयीन तरुणींना पैशांचे आमीष देऊन त्यांच्याकडून देहव्यापार करून घ्यायला सुरुवात केली. प्रत्येक तरुणीसोबत त्यांनी ५०० रुपयांत सौदा निश्चित केला. पण ग्राहकांकडून ते ५ हजार रुपये घेत.
Nagpur Rural Police Burst Sex Racket Crime