नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एवढी वर्षे कधीच तृतीयपंथीयांच्या विरोधात पोलिसांना कारवाईची गरज पडली नाही. पण मधल्या काळात नागपुरात असे काही घडले की, त्यामुळे कारवाईचा बडगा उगारण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्यायच उरलेला नाही. त्यामुळे आता घरोघरी जाऊन पैसे मागितले किंवा पैशांसाठी छळ केला तर पोलिसांच्या कारवाईला तृतीयपंथीयांना सामोरे जेवा लागू शकते, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
घरी कुठलेही शुभ कार्य असू द्या किंवा एखादे धार्मिक कार्य असू द्या, नाहीतर एखाद्याचा मृत्यू होऊ द्या. तृतीयपंथी दारात आले आणि त्यांच्या हातावर पैसे ठेवले तर पुढे चांगलं होण्यासाठी आशीर्वाद मिळतो, असा समज समाजात आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून या आशीर्वादाने अक्षरशः उच्छाद मांडलेला होता. तृतीयपंथीयांनी आपल्या टोळ्या करून एरिया वाटून घेतला होता. त्यात त्यांची भांडणंही व्हायची आणि मग त्यातून विचित्र घटना घडत होत्या. पण नागपूर पोलिसांनी आता अश्या तृतीयपंथीयांना थेट कारवाईचा इशारा दिला आहे. त्यासाठी पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत.
तर खंडणीचा गुन्हा
जे तृतीयपंथी जबरदस्तीने पैसे घेतील किंवा पैश्यांसाठी छळ करतील त्यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले आहे. थोडक्यात काय तर पैश्यांसाठी बळजबरी करून घराच्या आवारात ठाण मांडून बसणाऱ्या तृतीयपंथीयांविरोधातच पोलिसांनी कंबर कसली आहे.
टाळ्या वाजवल्या तरीही
टाळ्या वाजवल्या किंवा जोरजोराने गाणी म्हटली, मोठ्याने ओरडून पैसे मागितले म्हणजे तुमच्या घरी आलेले तृतीयपंथी खरे असतील, असे नाही. बरेचदा हे तृतीयपंथी नसल्याचेच सिद्ध झाले आहे. पण आतापर्यंत कुणीही आवाज उठवत नव्हते. आता मात्र त्यांच्याही विरोधात कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
Nagpur Police Threat Third Parties Money Demand