नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या विविध ऑनलाइन गेमिंग अॅप्सनी धुमाकूळ घातलेला आहे. या अॅपच्या आहारी जाऊन आर्थिक फटका बसणाऱ्यांचीदेखील कमी नाही. असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. एका व्यापाऱ्याला थोडेथोडके नव्हे तीर तब्बल ५८ कोटींचा झटका बसला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत गोंदिया येथून बुकीकडून १८ कोटी आणि सोने जप्त केले आहे.
प्राप्त माहितीनुसार, ऑनलाइन गेमींग’च्या तीन पत्ती, रमी आणि कसिनो अशा गेममध्ये पैसे लावल्यास दररोज लाखोंचा फायदा करून देण्याचे आमिष दाखवून गोंदियातील एका आरोपीने आपल्या नागपुरातील व्यापारी मित्राची ५८ कोटी रुपयांनी फसवणूक केली. यात आरोपीने बनावट लिंक पाठवून स्वत:च कोट्यवधींची रक्कम हडपली. नागपूर पोलिसांनी आरोपीच्या गोंदियातील घरात धाड टाकून १८ कोटी रोख, १५ किलो सोने आणि २०० किलो चांदी जप्त केली. अनंत उर्फ सोन्टू नवरतन जैन (रा. गोंदिया) असे गुन्हा दाखल झालेल्या बुकीचे नाव आहे.
२०२१ मध्ये पीडित व्यापाऱ्याने गेममध्ये पाच लाख रुपये लावले. त्याला काही तासातच आठ लाख रुपये मिळाले. जैनने मित्राला जास्त रक्कम लावण्यास प्रोत्साहित केले. ५ ते १० लाख रुपये लावल्यास लगेच १५ ते १८ लाख रुपये मिळत होते. तर १ कोटींची रक्कम लावल्यास ऑनलाइन गेममध्ये हरवून पैसे उकळले जात होते. कारवाईची कुणकुण लागताच आरोपी अनंत जैन पळून दुबईत गेल्याची चर्चा आहे. अनंतचा कापड व्यवसाय आहे. व्यापाऱ्याने त्याला आठ लाख रु. पाठविले. त्यानंतर एका लिंकच्या माध्यमातून खाते उघडले. खात्यात आठ लाख रुपये दिसल्यामुळे व्यापारी जुगार खेळायला लागला. सुरुवातीला जिंकल्यानंतर तो ५८ कोटी रुपये हरला. त्यामुळे त्याला शंका आली.
३० व्यापाऱ्यांची फसवणूक
अनंत याने नागपुरातील ३०पेक्षा अधिक व्यापाऱ्यांची शेकडो कोटींनी फसवणूक केल्याची माहिती आहे. अद्याप एकाच तक्रारदाराने पोलिसांत तक्रार केली आहे. फसवणूक झालेल्या व्यापाऱ्यांनी अनंतविरुद्ध पोलिसांत तक्रार करावी, तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होण्याची कुणकूण लागताच अनंत हा गोंदियातून पसार झाला. तो दुबईत असल्याची माहिती आहे. दुबईतून डायमंड एक्सचेंज नावाने हा ऑनलाइन जुगार चालविण्यात येतो. कॅसिनोतील ‘तीनपत्ती, अंदर बाहर’ व अन्य जुगार याद्वारे खेळल्या जातो.