नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नागपूर येथे आगमनप्रसंगी नागपूरकरांनी विमानतळावर अलोट गर्दी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभूतपूर्व स्वागत केले. नागपूरकरांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी समाज माध्यमांवर आपल्या भावना व्यक्त करीत त्यांच्या निवासस्थानाजवळ छत्रपती चौक येथे शुभेच्छा दिल्या.
विमानतळावर त्यांनी परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, पीरिपाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, सुभाष पारधी ॲड. राहूल झामरे, अनुसूचित जाती मोर्चाचे सतीश शिरसवान व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्यासमवेत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळ मार्गावर प. पू. हेडगेवार स्मारकास भेट देऊन या ठिकाणी स्वातंत्र्य देवीच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली. या भव्य विजयी मिरवणुकीत मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस सहभागी झाल्या होत्या. सोमलवाडा चौक, राजीव नगर, छत्रपती चौक, खामला, आठ रस्ता चौक, लक्ष्मीनगर, बजाज नगर, शंकरनगर, लक्ष्मी भुवन चौक या ठिकाणी स्थानिक नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी व मोठ्या संख्येत लाडक्या बहीणींनी मिरवणुकीत सहभाग घेऊन मुख्यमंत्री यांना शुभेच्छा दिल्या.