नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रीनितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेला अंबाझरी येथील स्वामी विवेकानंदांच्या जीवनावरील ‘लाईट अँड साऊंड शो’ बघून नागपूरकर भारावले. स्वामी विवेकानंदांच्या जीवन चरित्राचे अत्याधुनिक माध्यमातून घडलेले दर्शन अनोखे आणि अफलातून असल्याची भावना उपस्थित प्रेक्षकांनी व्यक्त केली. या मल्टीमीडिया शोचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते रविवारी (दि.६) झाले.
अंबाझरी उद्यानात साकारण्यात आलेल्या या शोच्या लोकार्पण सोहळ्याला मध्यप्रदेशचे मंत्री कैलाश विजयवर्गीय, माजी आमदार गिरीश व्यास, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीना, विश्वस्त इटकेलवार यांची प्रमुख उपस्थिती होती. गडकरी म्हणाले, ‘स्वामी विवेकानंद भारताच्या समृद्ध इतिहासाचे प्रतीक आहेत. भविष्यातील प्रगत भारत कसा असावा, याचे स्वप्न त्यांनी बघितले होते. अठरावे शतक मोघलांचे होते, एकोणविसावे ब्रिटिशांचे होते, वीसावे अमेरिकेचे आणि एकविसावे शतक भारताचे असेल, असे भाकित त्यांनी वर्तवले होते. त्यामुळे त्यांचे विचार आधुनिक माध्यमातून शाळकरी मुले व तरुणांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने हा शो तयार करण्यात आला आहे.’ नागपूर हे ऐतिहासिक शहर आहे. प्रेरणा देणारे शहर आहे. त्यामुळे स्वामी विवेकानंदांचा विचार या माध्यमातून नागपुरातून संपूर्ण देशभर पोहोचावा, हा उद्देश असल्याचेही गडकरी म्हणाले.
यावेळी ऑस्कर विजेते साऊंड इंजिनियर रसुल पकुटी, एमी अवॉर्ड विजेते अलफान्सो रॉय, ललित विकमशी, डॉ. रोहित माने, प्रिया चौधरी, पी.एस. पाटनकर, निरंजन देशकर, सतीश साल्पेकर, सुहास भावे, वरदराजन यांचा गडकरी यांच्या हस्ते सत्कार झाला.
नागपूर इनोव्हेशनची राजधानी – विजयवर्गीय
गडकरी यांच्यात उत्तम कलाकार ओळखण्याचे आणि त्यांना शोधून काढण्याचे अनोखे कौशल्य आहे. त्यामुळेच प्रत्येकवेळी नागपूरला आलो की नवीन काहीतरी अनुभवायला मिळते. आता इनोव्हेशनची राजधानी म्हणून नागपूरची देशभरात ओळख होऊ लागली आहे,’ असे गौरवोद्गार विजयवर्गीय यांनी काढले.
‘स्वामी विवेकानंद : कहानी अनुभूती की’*
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या या प्रकल्पाला ‘स्वामी विवेकानंद : कहानी अनुभूती की’ असे नाव देण्यात आले आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित हा शो असणार आहे. कन्याकुमारीच्या स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल आणि कोलकात्याच्या बेलूर मठावरुन स्फूर्ती घेवून हा देखावा तयार करण्यात आला आहे. मल्टी मिडीया शोचे दिग्दर्शन, राष्ट्रीय पुरस्कार विजेती, दाक्षिणात्य अभिनेत्री आणि दिग्दर्शिका रेवतीचे आहे. या शोचा आत्मा असलेले ध्वनी संयोजन ऑस्कर अवार्ड विजेते रसूल पुकुट्टी यांचे आहे. तर प्रकाशयोजना एमी अवार्ड विजेते सिनेमाटोग्राफर अलफोन्स रॉय यांचे आहे. तर संजय वडनेरकर यांचे पार्श्वसंगीत आहे. हा देखावा ६९ फूट लांबीचा असून उंची ३४ फूट आहे. येथे ३०० प्रेक्षकांची आसन व्यवस्था देखील आहे. या देखाव्याचे शिल्प नागपूरचे सुप्रसिध्द मूर्तिकार अलग अँगलचे हिरुभाई विकमशी आणि ललित विकमशी यांनी साकारले आहे. सदर शिल्पाचे थ्रीडी स्कॅनिंग देखील नागपूरच्या इमाजिस इंजिनिअरिंग सोलुशन्सचे डॉ. रोहीत माने यांनी केले आहे. अँपिथिएटर आणि कंट्रोल रुम तसेच परिसर विकासाच्या शिल्पकार प्रिया चौधरी असून प्रकल्पाचे स्ट्रक्चरल इंजिनिअर पुरुषोत्तम पाटणकर आहेत. इलेक्ट्रीकल डिझाईनर निरंजन देशकर, तर बांधकामाचे कंत्राटदार सुहास भावे आहेत. या प्रकल्पाचे व्यवस्थापन सतीश साल्पेकर यांनी केले आहे.