नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नागपूर जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळांमध्ये ५८० बोगस शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी असल्याचे समोर आल्यानंतर आता पोलिसांनी कारवाई सुरु करुन तीन जणांना अटक केली आहे. याआधी नागपूर विभागाचे शिक्षण उपचसंचालक उल्हास नरड, मुख्याध्यापक पराग पुंडके यांना अटक केली. त्यानंतर आता रात्री माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयाचे अधीक्षक निलेश मेश्राम, शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे शिक्षण उपनिरीक्षक संजय दुधाळकर, याच कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक सुरज नाईक यांना अटक केली आहे.
नागपूर जिल्ह्यात खासगी प्राथमिक शाळांमध्ये बोगस शिक्षकांची भरती केल्याच्या तक्रारीनंतर काही दिवसांपूर्वी नागपूर जिल्हा परिषदेचे वेतन अधीक्षक निलेश वाघमारे यांना शिक्षण विभागाकडून आदेश काढत निलंबित करण्यात आले होते. त्यांना निलंबन आदेशामध्ये जिल्ह्यात २०१९ पासून ५८० प्राथमिक शिक्षक तसेस शिक्षकेतर कर्मचारी यांची नियुक्त करण्यात आल्याचे म्हटले होते. या निलंबनानंतर आता मोठी कारवाई सुरु झाली आहे.
दरम्यान महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. २०१९ ते २०२२ दरम्यान नागपूर जिल्ह्यात झालेल्या शिक्षकांच्या बहुतांश नियुक्त्या बेकायदेशीर पध्दतीने कुठलीही मान्यता शिवाय करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यापैकी बहुतांश शिक्षकांचे अस्तित्व फक्त कागदावर असून त्यांच्या नावाने वेतन उचललं जात असल्याचा आरोप शिक्षक आमदार व महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष नागो गाणार यांनी केला आहे.