इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूर येथील एका आयपीएस अधिका-या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. इमामवाडा पोलिस स्टेशनमध्ये एका महिला डॅाक्टरने तीस वर्षीय आयपीएस अधिका-या विरोधात बलात्काराची तक्रार दिली आहे. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, आयपीएस अधिकारी आणि महिला डॅाक्टरची ओळख २०२२ मध्ये पहिल्यांदा इंन्स्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती. आरोप लागलेला तरुण तेव्हा सिव्हिल सर्व्हिसेसची तयारीच करत होता. तर पीडित महिला नागपुरात एमबीबीएसचे शिक्षण घेत होती.
इंन्स्टाग्रामच्या माध्यमातून झालेल्या ओळखीनंतर दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली. त्यानंतर भेटीगाठी वाढल्या. याच दरम्यान लग्नाचे आश्वासन देऊन तरुणाने वेगवेगळ्या ठिकाणी शारीरिक संबध ठेवल्याचा आरोप या महिला डॅाक्टराने तक्रारीत केला आहे. यानंतर मात्र तरुण सिव्हिल परिक्षा उत्तीर्ण होऊन आयपीएस अधिकारी झाला. त्यानंतर त्याने लग्नास नकार दिला. त्यामुळे या महिला डॅाक्टराने थेट पोलिस स्थानक गाठत तक्रार दिली. त्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे.