इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूरच्या महाल परिसरात झालेल्या वादात दोन गट आमने-सामने आले. त्यानंतर दोन्ही गटामध्ये दगडफेक झाली. संतप्त जमावाने जाळपोळ केली. या दगडफेकीत पोलीस जखमी झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. दोन्ही गटांनी केलेल्या दगडफेकीत अनेक वाहनांचं मोठं नुकसान झाले आहे. दरम्यान या घटनेनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांततेच आवाहन केले आहे.
या घटनेनंतर संतप्त जमावाला पांगवण्यासाठी नागपूर पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी पोहचला. त्यानंतर संतप्त जमावाला पोलिसांनी नियंत्रीत केले. पण, या घटानेत पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर थेट कु-हाडीने हल्ला केला गेला. या हल्लात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान पोलिसांनी असामाजिक घटकांची धडपकड केली असून १५ हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे.
नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यावर पोलीस प्रशासन परिस्थिती हाताळत आहे. या परिस्थितीमध्ये नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, आणि प्रशासनाला सहकार्य करा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
या घटनेत वाहनांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. वाहनांच्या काचा फुटल्या आहेत. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा देखील करण्यात आला. या परिसरात सध्या दहशतीचं वातावरण निर्माण झाले. पण, पोलिसांनी त्यानंतर सर्व परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलिसांनी नागपूर शहरातील कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर आणि कपिल नगर या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत हा कर्फ्यू लागू राहील अशी माहिती पोलिस आयुक्त डॉ. रविंदर कुमार सिंगल यांनी दिली.
नेमकं काय घडलं
सोमवारी दुपारी काही संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. यावेळी किरकोळ वाद झाला. मात्र सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या संख्येने जमलेल्या एका गटाने घोषणाबाजी सुरु केली. त्यानंतर तणाव वाढला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व जमावाला पांगवले. पण, त्यानंतर भालदारपुरा भागात मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली.