नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नागपूरच्या महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) अधिकाऱ्यांनी नागपूरमधल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर केनियातल्या नैरोबी येथून शारजा, युएईमार्गे आलेल्या भारतीय नागरिकाला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून ३.०७ किलो “ॲम्फेटामाइन प्रकारचा पदार्थ” जप्त केला.
शारजाहून एअर अरेबिया फ्लाइट क्रमांक G9-415 द्वारे नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या प्रवाशाने त्याच्या वैयक्तिक सामानात ठेवलेल्या आयताकृती पुठ्ठयाच्या खोक्यात वेष्टित पोकळ धातूच्या रोलरमध्ये हा प्रतिबंधित पदार्थ लपवला होता. ॲम्फेटामाइन हा अंमली औषधीद्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा, १९८५ च्या अनुसूची I अंतर्गत समाविष्ट असलेला एक सायकोट्रॉपिक(व्यक्तीच्या मनावर परिणाम करणारा ) पदार्थ असून त्याचा व्यापार प्रतिबंधित आहे. या व्यक्तीला अटक करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, नागपूर यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला डीआरआय कोठडी सुनावली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीकडून ज्या नायजेरियन नागरिकाला प्रतिबंधित पदार्थ पुरवला जाणार होता, त्याला अधिकाऱ्यांनी त्वरीत पाठपुरावा करून २१.०८.२०२३ रोजी पश्चिम दिल्लीच्या सुभाष नगर परिसरातून अटक केली.
नागपूरसारख्या छोट्या विमानतळावरून अत्यंत उत्तेजक ॲम्फेटामाइन प्रकारचा पदार्थ एवढ्या मोठ्या प्रमाणात जप्त करणे हे बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतलेल्या टोळ्यांकडून नवीन ठिकाणे आणि पद्धती अवलंबल्या जात असल्याचे सूचित करते. अशा टोळ्या उध्वस्त करण्यासाठी संचालनालय सातत्याने देखरेख ठेवत आहे.
3.07 Kgs of ‘Amphetamine Type Substance
Nagpur International Airport amphetamine Seized