नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डान्सबारवर राज्यात बंदी असली तरी चोरीछुप्या मार्गाने हा प्रकार सुरू असतो. मात्र, नागपूरात एका पंचतारांकीत हॉटेलात अश्लील नृत्य आणि त्यावर पैशांची उधळण असा धक्कादायक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे एका खासगी कंपनीच्या पार्टीतील हा प्रकार आहे. या पार्टीचा एक व्हिडिओ समोर आल्यामुळे पोलिसांनी आता कारवाई सुरू झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, एका खासगी कंपनीची पार्टी हॉटेलमध्ये सुरू होती. त्या पार्टीमध्ये कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी होते. पार्टीमध्ये डान्स सुरू असताना अचानक अश्लील नृत्याचा प्रकार सुरू झाला. उपस्थितांनीही त्याचा आनंद घेण्यास सुरुवात केली. पार्टी दरम्यान तिथे उपस्थित कर्मचारी अश्लील नृत्य करणाऱ्या महिलांवर पैशांची उधळण करत होते. या पार्टीतील हे व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर हॉटेल व्यवस्थापक आणि आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.
कंपनीसाठी चांगलं काम करणाऱ्यांना डीलरसाठी नागपूरच्या वर्धा रोडवरील शहराच्या वेशीवर असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये या पार्टीचे आयोजन झाल्याची माहिती मिळत आहे. या पार्टीत नागपुरातील डीलर्स सहभागी झाले होते. त्यातच अश्लील नृत्य केल्याचा प्रकार घडला. या पार्टीत तोकडे कपडे घालून राज्याबाहेरील आठ ते दहा तरुणी डान्स करत होत्या. तर त्याचवेळी पार्टीत उपस्थित असलेले कर्मचारी त्यांच्यावर पैशांची उधळण करत होते.
या व्हिडीओमध्ये कॉर्पोरेटमध्ये कर्मचारी तरुणींच्या अश्लील नृत्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. तरुणींसाठी शिट्ट्या वाजवत होते. काही कर्मचारी अति उत्साहाच्या भरात तरुणींना स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होते तर अनेक जण आपल्या मोबाईल फोनमध्ये त्यांचे अश्लील नृत्य रेकॉर्ड करत होते.
पोलिसांनी केली कारवाई
हॉटेलमधील अश्लील नृत्यप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या पार्टीतील अश्लील नृत्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणात कारवाईला सुरुवात केली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर येत आहे.