नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चोरीच्या अनेक घटना दररोज घडत असतात. चोरट्यांनी दरोडा घालून लुटल्याचा प्रकार नवीन राहिलेला नाही. मात्र, स्वत:च्याच घरी चोरी करण्याचा अनोखा प्रकार नागपूर येथे घडला आहे. एका महिलेने स्वत:च्या घरी मित्राच्या मदतीने थोडेथोडके नव्हे तर १३ लाखांची चोरी केली आहे. या घटनेबाबत पोलिसांनीदेखील आश्चर्य व्यक्त केले आहे.
नागपूर येथील गड्डीगोदाम परिसरातील ही घटना आहे. येथील यादव दाम्पत्याचा संसार सुखात सुरू होता. काही दिवसांपूर्वी पतीचा अपघात झाला. त्यादरम्यानच पत्नीचा जुना मित्र तिच्या संपर्कात आला. तिने या मित्राच्या सोबतीने आपल्याच घरात चोरी करण्याचा प्लॅन आखला. आरोपी पत्नी शिवानी यादव हिने आपल्या मित्राला व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून घरात कुठे पैसे आहे याची आधी माहिती दिली. नंतर ठरलेल्या दिवशी पतीला नातेवाईकाकडे जेवायला घेऊन मित्रांना आपल्याच घरी चोरी करायला बोलावले.
प्लॅननुसार चोराला म्हणजे मित्राला घरात कुठे काय ठेवले आहे त्याची सगळी माहिती दिली होती. प्लॅननुसार हे दोघे बाहेर जाताच तो घरात शिरला. काही वेळात ठरल्याप्रमाणे त्याने सगळा मुद्देमाल लंपास केला. घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचे पतीच्या निदर्शनास आले. मात्र, पतीला पत्नीच्या कारनाम्याची कोणीतीही कल्पना नसल्याने त्याने सदर पोलिसात चोरीची तक्रार दिली. पोलिसांनी सखोल तपास केला असता पत्नीनेच मित्राच्या मदतीने चोरी केल्याची बाब पतीच्या निदर्शनास आली.
पैसे घेऊन मित्र गेला पळून
यादव यांच्या घरी झालेल्या चोरीप्रकरणात पोलिसांना सुरुवातीपासून शिवानी यांच्यावर संशय होता. चोरी झाली त्या दिवसाचे सीसीटीव्ही फूटेज तपासले असता शिवानी या आपल्या पतीला बाहेर घेऊन गेल्या होते. त्या दिवसाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरी करणारा मित्र छत्री घेऊन जाताना दिसला. पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला. रामटेक तालुक्यातील त्याच्या घरी पोलिस पोहोचले. त्याच्या घराची झडती घेतली असता सोन्या चांदीचे दागिने सापडले. मात्र, रोकड घेऊन तो पसार झाला. सध्या शिवानी यादव हिची कारागृहात रवानगी झाली असून घटनेत सहभागी असलेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
nagpur crime wife theft own house friend police investigation