नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महिला सहकाऱ्यासोबत असभ्य वर्तन करणं एकाला इतकं भोवलं की, नागरिकांनी त्याला पोलिसांच्या तावडीतून आपल्या ताब्यात घेतले आणि भर रस्त्यावर चोप दिला. मौदा तालुक्यातील ही घटना असून याचा व्हिडियो सध्या संपूर्ण जिल्ह्यात व्हायरल झालेला आहे.
मौदा तालुक्यातील एका खासगी कंपनीचा सुपरव्हायजर रघुवेंद्र उपाध्याय हा त्याच्या महिला सहकाऱ्याला काही दिवसांपासून लग्नासाठी मागणी घालतोय. मात्र आपण विवाहित असून दोन मुलं आहेत, असे या महिलेने स्पष्टपणे सांगितले होते. याच कंपनीत महिलेचा पतीही कामाला आहे. त्यामुळे काही दिवस तो शांत राहिला. आरोपी सुपरव्हायजर असल्यामुळे त्याने तिला पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली. मोबाईलवर बोलणे सुरू केले. तो महिलेसोबत अश्लील चॅटिंग करू लागला.
व्हिडियो कॉल करून अश्लील हातवारे करू लागला. व्हिडियो कॉल केला नाही तर तुझ्या नवऱ्याला मारून टाकेन, अशी धमकीही त्याने दिली होती. अश्यात तिने घाबरून व्हिडियो कॉल केला तर आरोपीने तो कॉल रेकॉर्ड करून ठेवला. आता या कॉलच्या नावाने तो महिलेला ब्लॅकमेल करू लागला. अखेर महिलेने आपल्या पतीला घडलेला प्रकार सांगितला.
दोघेही घाबरले
रघुवेंद्र उपाध्याय याने जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे महिला व तिचा पती दोघेही घाबरले. त्यामुळे ते पोलिसांमध्येही तक्रार करायला गेले नाही. पण एक अश्लील चित्रफित व्हायरल करण्याची धमकी दिल्यावर मात्र दोघेही पोलिसांत तक्रार करायला गेले. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून घेतला, पण अटक केली नव्हती.
भाजपचे आंदोलन
गुन्हा दाखल होऊनही आरोपीला अटक होत नसल्याने भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनसमोरच आंदोलन सुरू केले. तक्रार न घेणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई आणि आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत पोलीस स्टेशनसमोरून उठणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला होता.
रस्त्यातच धुलाई
पोलिसांनी अखेर आरोपीला अटक केली आणि अटक करून स्टेशनला नेत असतानाच भाजपचे कार्यकर्ते व सामान्यन नागरिकांनी आरोपीला पोलिसांच्या तावडीतून आपल्या ताब्यात घेतले. आरोपीचे कपडे फाडले व त्याची रस्त्यावरच धुलाई केली.
Nagpur Crime Vulgar Chatting People Beaten
Married Women