नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सासू-सुनेतील वाद नवीन नाहीत. पिढ्यानपिढ्या सुरू असलेला हा वाद घरोघरी दिसून येतो. मात्र, अशा वादातून हत्या करण्याचा धक्कादायक आणि नात्याला काळीमा फासणारा प्रकार नागपूरात घडला आहे. येथे एका सुनेने स्वत:च्या ८० वर्षीय सासूचा गळा चिरून हत्या केली आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संभाजी चौक परिसरात ही घटना घडली आहे. सुनेने ८० वर्षीय सासूची चाकूने भोसकून हत्या केली आहे. ताराबाई शिखरवार असे हत्या झालेल्या वृद्ध सासूचे नाव आहे. तर पूनम आनंद शिखरवार असे हत्या करणाऱ्या आरोपी सुनेचे नाव आहे. या प्रकरणााची माहिती मिळताना प्रतापनगर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपी सुनेला अटक केली. सासू ताराबाई आणि सून पूनम यांच्यात कौटुंबिक कारणाने नेहमी वाद व्हायचे. यातूनच संतापलेल्या सुनेने ताराबाई यांच्यावर चाकूने हल्ला केला. यात ताराबाई यांचा मृत्यू झाला. पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आनंदचे घराजवळ गॅरेज आहे. गेल्या काही महिन्यांपासून पूनमवर मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून ती औषध घ्यायला नकार द्यायची. शनिवारी सायंकाळी अचानक फळभाजी चिरण्याचा चाकू पूनमने हातात घेतला. तारादेवी यांच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले. तारादेवी यांनी आरडाओरड केली. पूनमचे वार सुरूच होते. रक्ताच्या थारोळ्यात तारादेवी खाली कोसळल्या व त्यांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच आनंद घरी आला. एका नागरिकाने प्रतापनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी तारादेवी यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. प्रतापनगर पोलिसांनी पूनमला ताब्यात घेतले आहे.