नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वर्गमित्राने विद्यार्थीनीसोबत जवळीक निर्माण केली. तिला भेटीसाठी बोलावून घेतले. ती येताच मित्राच्या मदतीने कारमध्ये कोंबून अपहरण केले. जंगलात नेऊन दोघांनीही सामूहिक अत्याचार केला. ही धक्कादायक आणि तेवढीच संतापजनक घटना सावनेरमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोन युवकांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. अखिल महाविर भोंगे (२६) रा. पंदराखेडी, ता. सावनेर आणि पवन विठ्ठलराव बासकवरे (२४) मानेगाव, ता. सावनेर अशी आटकेतील आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ वर्षीय पीडित मुलगी सावनेरमधील एका विद्यालयात दहावीत शिकते. अखिल भोंगे हा तिचा वर्गमित्र आहे. त्याने जाळे टाकून तिच्यासोबत जवळीक निर्माण केली. तारुण्याच्या उंबरठ्यावर असतानाच त्यांच्यात प्रेम फुलले. पवन बासकवरे हा अखिलचा जीवलग मित्र आहे. २३ जानेवारीला सायंकाळी अखिल प्रेयसीला भेटण्यासाठी थेट शाळेतच आला. यावेळी पनवसुद्धा त्याच्या सोबत होता. अखिलने पीडितेसोबत बोलणी करून तिला सोबत फिरायला जाण्यासाठी राजी करून घेतले. आरोपींच्या मनात नेमके काय चालले हे तिच्या ध्यानीमनीही नव्हते. ती सहजपणे फिरायला जाण्यासाठी तयार झाली आणि घात झाला.
शाळेसमोरूनच अपहारण
पीडिता शाळेबारहेर पडताच अखिलने तिला कारमध्ये ओढून घेतले. त्यानंतर कार नागपूरच्या दिशेने सुसाट निघाली. आरोपींनी वाटेतच निर्जन ठिकाणी जंगली भागात कार थांबविली. बळजबरीने तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. दोघांपुढे तिचा प्रतिकार कमी पडला. आरडा ओरड करूनही कुणीच मदतीसाठी पोहोचू शकले नाही.
बेशुद्धावस्थेत सोडून काढला पळ
सामूहिक बलात्कारामुळे पीडिता बेशुद्ध झाली. आरोपी तिला रस्त्याच्या कडेला टाकून पळून गेले. रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहनचालकाचे तिच्याकडे लक्ष गेले. जवळ जाऊन बघितले असता ती जिवंत होती. त्याने तिला पिण्यासाठी पाणी दिले आणि घरी सोडून देण्याबाबत विचारले. तिने सावनेर पोलिस ठाण्यापर्यंत सोडण्याची विनंती केली. ती पोलिस ठाण्यात पोहचली. तिने पोलिसांनी घडलेली प्रकार सांगितला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली.
Nagpur Crime Gang Rape on student by classmate