नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नागपूरच्या जामठा क्लोव्हर लीफ जंक्शनवर ‘बर्ड पार्क’ विकसित केले जाणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नागपूर क्षेत्रीय कार्यालाने पुढाकार घेतला आहे. प्राधिकरणाने १० प्रकल्पांमध्ये एकूण ३६* हजार वृक्षारोपण करण्यात आले आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण -एनएचएआय द्वारे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरामध्ये वृक्षारोपण करण्यात येत आहे. या राष्ट्रव्यापी वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ 12 जुलै 2023 रोजी आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला होता. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जाहीर केलेल्या हरित महामार्ग धोरण – 2015 मधील नियमानुसार एनएचएआयने वार्षिक वृक्षारोपण कृती योजनेचा भाग म्हणून वर्ष 2016-17 ते 2022-23 या काळात 3.46 कोटी रोपट्यांची लागवड केली. यावर्षी 56 लाखांहून अधिक रोपे लावण्याचे उद्दिष्ट निश्चित झाले असून हे काम पावसाळ्यापासूनच सुरु झाले आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नागपूर क्षेत्रीय कार्यालयाद्वारे देखील 2015 पासून आतापर्यंत 16.59 लाख रोपे लावण्यात आली आहेत. 2023 -24 या वर्षासाठी 3.73 लाख रोपे लावण्याचा संकल्प क्षेत्रीय कार्यालयाने घेतला असून 12 जुलै रोजी क्षेत्रीय कार्यालय नागपूर अंतर्गत येणाऱ्या अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, नांदेड, नागपूर, वाशिम आणि यवतमाळ अशा 10 प्रकल्प अंमलबजावणी युनिटमध्ये एकूण 36 हजार वृक्षारोपण करण्यात आले. यापैकी 20 हजार रोपे हे रस्त्यालगत तर 16 हजार रोपे रस्त्याच्या मध्यिका मार्गामध्ये लावण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे अमृत सरोवरांच्या जागी देखील 610 रोपे क्षेत्रीय कार्यालय नागपूर द्वारे लावण्यात आली आहेत.
ओसाड जमीन तसेच क्लोव्हर लीफ जंक्शनवर ही वृक्षारोपण केले जात असून मियावाकी आणि ऑक्सिजन पार्क मॉडेल्सवर काही वृक्षारोपण केले जात आहेत. नागपूरच्या वर्धा रोडवरील जामठा येथील क्लोव्हर लीफ जंक्शनवर (चौफुली रस्त्यावर) फळझाडे लावून ‘बर्ड पार्क’ विकसित केले जात आहे जे नागरिकांसाठी मनोरंजनाच्या सुविधांसह पक्षी निरीक्षकांना आकर्षित करणार आहे.
या वृक्षारोपण कार्यक्रमात -एनएचएआय नागपूरच्या प्रकल्प अंमलबजावणी युनिटच्या अधिका-यांसह पोलीस विभागाचे अधिकारी, वाहतूक पोलीस विभाग, शालेय शिक्षक आणि विद्यार्थी, ग्रामस्थ, स्थानिक नागरिक यांनी सहभाग घेतला होता.