येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दक्षिण मध्य रेल्वेचे शेवटचे स्टेशन असलेल्या नगरसुल रेल्वे स्टेशनला शिर्डीमुळे विशेष महत्त्व आले आहे.मात्र स्थानिकांसाठी या स्टेशनचा विशेष उपयोग होत नसल्याने नंदिग्राम, जनशताब्दी, देवगिरी आणि तपोवन या एक्सप्रेसला या ठिकाणी थांबा देण्याची गरज आहे. दक्षिण भारतात जाण्यासाठी येथून अनेक गाड्या आहेत. मात्र मुंबईकडे जाण्यासाठी गाड्या नसल्याने येवलेकरांची गैरसोय आहे. त्यामुळे या तीनही एक्सप्रेसला थांबा देण्यात यावा अशी मागणी येथील माजी सरपंच व येवला बाजार समितीचे माजी संचालक प्रमोददादा पाटील यांनी केली आहे.
येवला हे चार जिल्ह्यांचे मध्यवर्ती ठिकाण असुन येथे पैठणी साडी तसेच टॉवेल, टोपी, उपरणे, कापड उद्योगाची मोठी बाजारपेठ आहे.येवला तालुक्यातील कांदा हा परराज्यात रेल्वेने मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो.येथे बाहेरगावहून येणारे तसेच तालुक्यातील नागरिकही प्रवासासाठी रेल्वेवर विसंबुन आहेत. रेल्वे प्रवास हा आरामदायी, अर्थिक दृष्ट्या परवडणारा असल्याने रेल्वेला प्रवासासाठी प्रथम प्राधान्य दिले जाते. येवल्यातील अनेक प्रवासी नगरसुल रेल्वे स्थानकावर येऊन मुंबईसह औरंगाबाद,नांदेड ते तिरुपती पर्यत प्रवास करतात.दक्षिण भारतातून हजारो प्रवासी या स्टेशनवर उतरून शिर्डीला दर्शनासाठी जातात.त्यामुळे नगरसुल स्टेशन तसे रेल्वेच्या दृष्टीने महत्त्वाचे राहिले आहे. मात्र येथे प्रमुख एक्सप्रेसला थांबा नसल्याने संपूर्ण येवला तालुक्यातील प्रवाशांची गैरसोय सुरू आहे.
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाअंतर्गत नगरसुल रेल्वे स्थानकावर कोरोना येण्याअगोदर नंदिग्राम एक्सप्रेस या गाडीला अधिकृत नियमित थांबा होता. परंतु कोरोना काळात बंद केलेला थांबा अजूनही सुरू न झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. परिसरातील प्रवाशांची व साई भक्तांची मोठी गैरसोय होत असून नंदीग्राम एक्स्प्रेसला पूर्वीप्रमाणेच अधिकृत थांबा देण्यात यावा अशी मागणी श्री.पाटील यांनी केली आहे. याबाबत रेल्वेकडे अनेकदा मागणीही केली असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच नांदेड-मुंबई-नांदेड तपोवण एक्सप्रेस,औरंगाबाद-मुंबई-औरंगाबाद जनशताब्दी एक्सप्रेस,मुंबई ते नांदेड देवगिरी एक्स्प्रेस आणि नांदेड – पुणे राज्यराणी एक्स्प्रेसला या गाड्यांना देखील नगरसुल रेल्वे स्थानकात थांबा मिळावा तसेच जालना नगरसूल पसेंजर पुढे कासारा मुंबईपर्यत वाढवावी. जालना नगरसुल पॅसेंजर देखील सुरू असून तिचा विस्तार पुढे इगतपुरी कासारापर्यंत केल्यास स्थानिकांची अजून सोय होणार असल्याचेही श्री.पाटील यांनी म्हटले आहे.
“नगरसुल रेल्वे स्थानकात स्थानिक व्यापारी,विद्यार्थी,नोकरदार वर्ग, शेतकरी,
साईभक्त,रेल्वे प्रवासी यांच्या सोयीच्या असल्याने या गाड्यांना अधिकृत थांबा देण्यासाठी रेल्वेने पुढाकार घ्यावा.नाशिकच्या कुभमेळयासाठी नगरसुल रेल्वे स्टेशन महत्त्वाचे आहे.नासिकरोड व मनमाड स्टेशनचा भार कमी करण्यासाठी नगरसुल स्टेशन उपयोगात येते.या सर्व दृष्टीने प्रवासी हितासाठी एक्सप्रेस थांबा गरजेचा आहे.”
-प्रमोददादा पाटील,माजी सरपंच, नगरसुल