येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून नगरसूल रेल्वे स्थानकावरील रेल्वे संरक्षण दल (RPF) आऊटपोस्टचे स्वतंत्र पोस्टमध्ये म्हणजेच पूर्ण स्वरूपाच्या स्वतंत्र पोलीस स्टेशनमध्ये श्रेणीवर्धन करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी पोलीस निरीक्षकांसह एकूण २४ अधिकारी व कर्मचारी देखील नियुक्त करण्यात आले आहेत. प्रवासी वर्गाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे श्रेणीवर्धन अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.
आरपीएफ हे प्रामुख्याने रेल्वेच्या स्थावर मालमत्तेचे संरक्षण, तसेच रेल्वेस्थानक परिसरातील व रेल्वेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी देखील पार पाडत असते. या सुरक्षा दलाची आपल्या येवला तालुक्यातील नगरसूल रेल्वे स्टेशन आऊटपोस्ट (पोलीस चौकी) होती. ही चौकी छत्रपती संभाजीनगर आरपीएफ पोलीस स्टेशन अंतर्गत येत होती. नगरसूल ते छत्रपती संभाजीनगर अंतर जवळपास १०० किलोमीटर आहे. या दरम्यान रोटेगाव (वैजापूर), दौलताबाद अशा काही रेल्वे पोलीस आऊटपोस्ट येतात.
येवला-लासलगाव मतदारसंघातील महत्त्वाचे असणारे नगरसूल रेल्वे स्टेशन हे टर्मिनल स्टेशन असून आंध्रप्रदेश, तेलंगणातून शिर्डीला येणाऱ्या भाविकांच्या सर्व रेल्वेगाड्या नगरसूल येथे टर्मिनेट होतात. रेल्वेच्या अनेक गाड्या या ठिकाणी टर्मिनेट किंवा स्टेबल होतात. तसेच कांद्याची मोठ्या प्रमाणात जावक होत असल्याने किसान रेलचे मोठ्या प्रमाणात लोडिंग होते. या सर्व गोष्टींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पूर्वीच्या आऊटपोस्टच्या पायाभूत सुविधा पुरेशा ठरत नव्हत्या.
हे लक्षात घेऊन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी छत्रपती संभाजीनगर पोस्टचे विभाजन करून नगरसूल आऊटपोस्टचे पोलीस पोस्टमध्ये म्हणजेच मुख्य पोलीस स्टेशनमध्ये श्रेणीवर्धन करण्याची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी केली होती. यासंदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी दि. १ ऑगस्ट २०२४ आणि १६ मे २०२५ रोजी दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबादचे महाप्रबंधक अरुणकुमार जैन यांना, तसेच दि. २० जुलै २०२५ रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून मागणी केली होती. त्यांच्या या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे मंत्रालयाकडून नगरसूल स्टेशनसाठी स्वतंत्र आरपीएफ पोस्ट मंजूर करण्यात आली आहे.
पूर्वीच्या आऊटपोस्टचे प्रमुख हे पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी असायचे. आता या पोलीस स्टेशनचे प्रमुख म्हणून पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. यासह १ उपनिरीक्षक, १ सहाय्यक उपनिरीक्षक, १० हेड कॉन्स्टेबल, ११ कॉन्स्टेबल असे एकूण २४ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोठे मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. आगामी काळात स्वतंत्र चारचाकी वाहनाची तरतूद देखील करण्यात येईल.
रेल्वेकडून करण्यात आलेल्या श्रेणीवर्धनामुळे रेल्वे प्रवाशांची सुरक्षाव्यवस्था नक्कीच भक्कम होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे मानवी तस्करी रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन आहट’ या अभियानाला देखील यामुळे मोठे बळ मिळणार आहे. तसेच आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने देखील ही गोष्ट नक्कीच खूप महत्त्वाची ठरणार आहे. कारण दक्षिण भारतातून रेल्वेमार्गे शिर्डी किंवा नाशिकला येण्यासाठी नगरसूल हेच मुख्य स्टेशन असणार आहे.
नगरसूल रेल्वे स्टेशनचा नुकताच मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून अमृत भारत योजनेत समावेश करण्यात आला आहे. याबरोबरच बॅलास्टलेस ट्रक तसेच कव्हर्ड गुड्स शेड देखील मंजूर करण्यात आले. त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांची संख्या तर वाढणार आहेच, पण भविष्यात नगरसुल रॅक पॉइंट कार्यान्वित होऊन खतांचे रॅक देखील येथे उतरवले जाणार आहेत. या सर्व गोष्टींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे श्रेणीवर्धन नक्कीच अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.
आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून नगरसूल हे महत्त्वाचे टर्मिनल मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून विविध प्रकारच्या सोयीसुविधांनी सुसज्ज होत आहे. आगामी काळातही या सुविधांमध्ये आणखी भर घालत ते आणखी सुसज्ज करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचा पाठपुरावा सुरू आहे.