नवी दिल्ली – ईशान्य भारतातील नागालँडच्या मोन जिल्ह्यातील ओटिंग गावात शनिवारी सायंकाळी सुरक्षादलांच्या जवानांनी कथितरित्या केलेल्या गोळीबारात कमीत कमी ११ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती आहे. ओटिंग गावात दहशतवादी असल्याच्या शक्यतेवरून सुरक्षा दलाच्या जवानांनी कथितरित्या गोळीबार केला. नागालँडचे मुख्यमंत्री नेफेयू रियो यांनी या घटनेला दुजोरा दिला असून गोळीबाराची निंदा केली आहे. नागरिकांनी शांतता राखावी असे आवाहन करत त्यांनी घटनेची एसआयटीकडून चौकशी करण्याचे आदेशही दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ट्विटमध्ये लिहितात, नागालँडच्या ओटिंगमध्ये एका दुर्दैवी घटना घडली आहे. ज्या नागरिकांना जीव गमवावा लागला, त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहवेदना व्यक्त करत आहे. राज्य सरकारतर्फे गठित करण्यात आलेली उच्चस्तरीय एसआयटी या घटनेची चौकशी करणार आहे.
मुख्यमंत्री नेफियू रियो ट्विटमध्ये लिहितात, मोन जिल्ह्यातील ओटिंगमध्ये झालेली नागरिकांची हत्या ही एक दुर्दैवी आणि निंदनीय घटना आहे. पीडितांच्या कुटुंबाबद्दल मी सहानुभूती व्यक्त करतो. जखमी नागरिक लवकरच बरे होती अशी आशा व्यक्त करतो. या घटनेची उच्चस्तरीय एसआयटी चौकशी करणार असून, पीडितांना कायदेशीर न्याय मिळेल. सर्व नागरिकांना शांततेचे आवाहन करतो.
https://twitter.com/AmitShah/status/1467345038615068675?s=20
नागालँडच्या मोन जिल्ह्यात दहशतवादविरोधी मोहिमेदरम्यान सामान्य नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची कोर्ट ऑफ इन्क्वायरी करण्याचे आदेश भारतीय लष्कराने दिले आहेत. ही घटना आणि त्यानंतर जे झाले ते खेदजनक आहे. या घटनेत सुरक्षारक्षकही गंभीररित्या जखमी झाल्याचे लष्काराने म्हटले आहे. या घटनेनंतर परिस्थिती तणावपूर्ण आहे. या घटनेबद्दल ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष आहे. काही संतप्त ग्रामस्थांनी जवानांच्या वाहनांना आग लावली. यात काही जवान जखमी झाल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे.